पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये ‘अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती’ आणि ‘पोलीस दीदी’

@प्रमोद चव्हाण

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मुंबई विभागाचे गुप्तचर अधिकारी कुलभूषण सिंग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना

तरुण पिढीला सध्या सहज उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांमुळे अनेक तरुण मुले-मुली त्याच्या आहारी गेल्याचे समोर येत असते. सोबतच लहान मुलांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे सुद्धा दिवसेंदिवस डोके वर काढत आहेत. अशावेळी आपल्या विद्यार्थ्यांना काय योग्य आणि काय अयोग्य, एक वाकडे पाऊल कुठल्या कुठे घेवून जावू शकते याची माहिती करून देण्यासोबत कायदे योग्य मार्गाने समजून देण्यासाठी पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये २६ जून, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ‘अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती’ आणि २८ जूनला ‘पोलीस दीदी’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मुंबई विभागाचे गुप्तचर अधिकारी कुलभूषण सिंग आणि पवई पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शाळा, महाविद्यालयातील तरूण पिढी या अंमली पदार्थाच्या व्यसनाधिन होऊ नये, याकरिता पोलिसांसह, विविध स्वयंसेवी संस्था जनजागृती मोहिम राबवत असतात. मात्र या कार्यक्रमात क्वचित वेळीच विद्यार्थ्यांचा सहभाग पहावयास मिळतो. विद्यार्थी दशेत असतानाच मुलांना याचे आकर्षण निर्माण होते आणि त्यांचे पाऊल वाकड्या मार्गावर पडते, म्हणूनच विद्यार्थी दशेतच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून पाठीमागील ४ वर्षापासून पवई इंग्लिश हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी अशा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करत असते.

कुलभूषण सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नशाखोरीच्या विळख्याबाबत आपले अनुभव सांगताना सांगितले कि, ‘केवळ जिज्ञासेपोटी अंमली पदार्थांची चव चाखणारे आज त्याच्या गर्ततेत आपसूकच सापडले आहेत. असे लोक आपल्यासह आपल्या संपूर्ण परिवाराचे आयुष्य उध्वस्त करतात.’ अंमली पदार्थाच्या नशेच्या आहारी गेलेल्या मुलांच्यात दिसणारी लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना याबाबतही त्यांनी यावेळी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. अंमलीपदार्थ विरोधी कायद्याचे विश्लेषण देत, यातील अपराध्यांना १० ते २० वर्ष शिक्षा आणि पुन्हा पुन्हा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेप होण्याची शक्यता सुद्धा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अंमली पदार्थामुळे होणारे दुष्परिणाम तसेच नशामुक्तीचे संदेश छत्र्यांवर लिहून त्यांचे वाटप विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आले.

‘शाळेत सर्व स्तरातून शिकण्यासाठी मुले येत असतात, त्यांच्या आसपास अंमलीपदार्थ सेवनाच्या गोष्टी घडल्यावर किंवा संगतीने सुरुवातीला मज्जा म्हणून त्यांच्याकडून केला गेलेला प्रयोग नंतर जीवावर बेतू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये दुष्परिणामाबाबत जनजागृती व्हावी म्हणून आमच्या शाळेत से नो टू ड्रग्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते,” असे यावेळी आवर्तन पवईशी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका शेरली उदयकुमार यांनी सांगितले.
पोलीस दीदी पोहचली विद्यार्थ्यांच्या भेटीला

पवई पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक अनघा सातवसे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना

अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती प्रमाणेच बालकांवरील आणि महिलांवरील अत्याचारांबाबत जनजागृती करण्यासाठी पवई इंग्लिश हायस्कूल आणि पवई पोलिसांच्यावतीने शाळेत ‘पोलीस दीदी’ परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पवई पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांनी विद्यार्थ्यांना काय काळजी घ्यावी आणि प्रतिकार कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक अत्याचारांबाबत माहिती देण्यात आली. अशा प्रसंगी जोरजोरात ओरडावे, शिक्षकांना-पालकांना याबाबत त्वरित माहिती द्यावी किंवा शक्य असल्यास १०० नंबर डायल करून पोलिसांना माहिती देवू शकता. असे यावेळी मार्गदर्शन करताना सातवसे यांनी बोलताना सांगितले.

सायबर सुरक्षा आणि नशामुक्ती संदर्भातही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

विशेषतः महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांतर्फे विशेष महिला पोलीस बीट मार्शलस आणि मोबाईल ५ या विशेष महिला मदत पथकाची प्रत्येक पोलीस ठाण्यात निर्मिती करण्यात आली आहे. महिलांच्या विशेष सुरक्षेची जबाबदारी हे पथक पार पडत असते. महिलांना असुरक्षित वाटताच यांना संपर्क साधू शकतात. असेही यावेळी सांगून विद्यार्थिनीमध्ये पोलिसांबाबत विश्वास संपादन करण्यात आला.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!