प्रामाणिक रिक्षा चालकांचा पवई पोलिसांनी केला सन्मान

काच दिवशी दोन वेगवेगळ्या रिक्षात दोन वेगवेगळ्या प्रवाशांनी विसरलेल्या बॅग दोन्ही रिक्षा चालकांनी प्रामाणिकपणा दाखवत पोलीस ठाण्यात जमा करून मूळ मालकाला मिळवून दिल्याची अभिमानास्पद घटना पवईमध्ये घडल्या. रिक्षाचालकांच्या या प्रामाणिकपणाबद्दल पवई पोलिसांनी त्यांचा सन्मानही केला.

पहिल्या घटनेत रामबाग क्रिस्टलकोर्ट येथील रहिवाशी जगदीश एन जोशी यांनी रविवारी आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे समान घेवून हिरानंदानी हॉस्पिटल येथून रिक्षा पकडली. इमारतीजवळ आपले उतरवलेले सामान व्यवस्थित आहे का हे पाहत असताना रिक्षाच्या पाठीमागील भागात ठेवलेली एक बॅग उतरवली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी रिक्षा शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ती निघून गेली होती.

“जोशी आमच्याकडे तक्रार देण्यासाठी आले असताना, आम्ही सिसिटीव्हीच्या आधारे त्या रिक्षाचा नंबर आणि ती कुठे गेली याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच, रिक्षाचालक राकेश अशोक पंडित स्वतःच बॅग घेवून पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी पोहचला” असे याबाबत बोलताना कर्तव्यावर असणारे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बगाटे यांनी सांगितले.

बॅगेत कपडे, लॅपटॉप आणि सोन्याचे दागिने असे किमती सामान होते. तक्रार देण्यासाठी आलेल्या जोशी यांचीच ती बॅग असल्याची खात्री झाल्यावर त्यांच्या ताब्यात बॅग देण्यात आली. प्रामाणिकपणा दाखवणारे रिक्षाचालक राकेश पंडित यांचा पोलीस निरीक्षक (गुन्हे) धामुनसे व पोलीस उपनिरीक्षक बगाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत चांदिवली येथील संघर्षनगर येथे राहणारे रिक्षाचालक शहाजी अशोक आंब्रे (२९) यांच्या रिक्षात एक प्रवाशी लॅपटॉप बॅग विसरून गेला आहे हे त्यांच्या लक्षात येताच, त्यांनी ती बॅग पवई पोलीस ठाण्यात जमा केली.

कर्तव्यावर असणारे पोलीस उप निरीक्षक अनिल विसपुते यांनी बॅग तपासून पाहिले असता, तुंगागाव येथील ओमशांती इमारतीत राहणारे आनंद शुक्ला यांची ती बॅग असल्याची समजताच त्यांना माहिती देवून ती बॅग परत करण्यात आली.

प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल रिक्षाचालक शहाजी आंब्रे यांचा पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल विसपुते यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes