भारत बंदला पवईत संमिश्र प्रतिसाद, पेट्रोलपंप बंद ठेवल्याने वाहनचालकांची कोंडी

@रविराज शिंदे, रमेश कांबळे

इंधन दरवाढी विरोधात सोमवारी (१० सप्टेंबर) विरोधकांनी पुकारलेल्या भारत बंदचे संमिश्र पडसाद पवईतही पहायला मिळाले. येथील कॉग्रेस, मनसे, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी बंदमध्ये सहभाग घेत, निदर्शने करत जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवर (जेविएलआर) आयआयटी मेनगेट येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवणेच व्यापाऱ्यांनी पसंद केले होते.

आंदोलकांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी पक्षाच्या विरोधात नारेबाजी करत चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले.

आयआयटी येथे व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेली दुकाने

व्यापारी संघटना आणि मालकांनी सुद्धा या बंदला साथ देत आयआयटी, हिरानंदानी, चांदिवली, साकीविहार रोड येथील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवली होती. तर काही ठिकाणी छुप्या पद्दतीने दुकाने सुरूच असल्याचे पहायला मिळत होते.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांनी वाहने रस्त्यावर उतरवण्याचे टाळल्याने पवईतील अनेक रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. जेव्हीएलआरवर पवईच्या हद्दीत असणारे सगळेच पेट्रोल पंप यावेळी बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर उतरलेल्या काही वाहनचालकांची चांगलीच कोंडी झाली होती. मात्र दुपारनंतर सर्व पूर्ववत झाल्यामुळे पवईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!