पवईकरांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेचे अभय?

डावीकडे – पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपला जोडणी केलेला भाग, उजवीकडे कर्मचारी कामाच्या ठिकाणी पाईप जोडताना

पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या पवईकरांच्या हिस्स्याचे पाणी आपल्या रस्तेबांधणीच्या कामात खाजगी कंत्राटदार वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम कांबळे यांनी या चोरीचा व्हिडीओ सोशल माध्यमातून प्रसारित करत याचा भांडाफोड केला.

हा प्रकार उघडकीस येताच पवईकरांच्या तोंडचे पाणी पळवले जात असल्याने रहिवाशी संताप व्यक्त करत आहेत. या कंत्राटदाराला पालिकेने अभय दिले असून, हे असेच सुरु राहिल्यास भविष्यात येथील नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते असा आरोप देखील येथील नागरिकांनी केला आहे.

पवईतील अनेक भागात गटार आणि रस्ते निर्मितीची कामे सुरु आहेत. यातील चैतन्यनगर येथील रस्त्याचे आणि गटार बांधणीचे काम योगेश कन्स्ट्रक्शन नामक कंत्राटदार कंपनीमार्फत होत आहे. कोणतेही विकासकाम सुरू असताना संबंधित कंत्राटदाराने त्या कामासाठी टँकरचे पाणी वापरण्याचा नियम आहे. परंतु सदर कंत्राटदार कंपनी येथील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनमधून पाणी चोरी करून या कामासाठी वापरले जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम कांबळे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून समाजमाध्यमाच्या साहय्याने उघडकीस आणले आहे.

डावीकडे – पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपला जोडणी केलेला भाग, उजवीकडे – वाहिनीला जोडणी केलेले पाईप

आयआयटी भागातील स्वामीनारायन नगर, गौतमनगर, देवीनगर, गरीबनगर आदी डोंगराळ भागात पालिकेचे पाणी पोहोचत नसल्याने १० वर्षांपूर्वी दुर्गादेवी शर्मा उद्यानात ५० हजार लिटरची टाकी बांधण्यात आली असून, या टाकीतूनच डोंगराळ भागात पाणी चढवले जाते. मात्र पाणी टंचाईमुळे परिसरात आधीच पाण्याची कपात केली जात असतानाच येथील नागरिकांच्या हिस्स्याचे पाणी कंत्राटदार असे चोरून वापरत असल्याने पवईकर संतप्त झाले आहेत. या चोरी विरोधात लवकरच नागरिक नगरसेवक आणि पालिका कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘कंत्राटदाराकडून पाण्याच्या चोरीच्या प्रकाराबाबत आपण अनभिज्ञ असून, हे गंभीर असल्याने आपण तात्काळ लक्ष घालत वरिष्ठांशी बोलून तथ्य आढळल्यास कारवाई करू’ असे पालिका ‘एस’ विभागातील पाणी खात्याचे कनिष्ठ अभियंता तुषार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांनी मात्र या प्रकाराबाबत साफ नकार देत ‘या प्रकाराबाबत गैरसमज पसरवला जात आहे. कंत्राटदार टँकरने लोखंडी कंटेनरमध्ये पाणी टाकतो आणि त्यातील पाणी कामासाठी वापरले जाते. पवईकरांच्या हिस्स्याचे एक थेंबही पाणी इतरत्र वापरले जात नाही’ असे याबाबत बोलताना ठामपणे सांगितले.

स्टॉप प्रेस – आज (मंगळवार, ०७ मे २०१९) पालिका अधिकाऱ्यांनी परिसरात चाललेल्या कामाची पाहणी करताना येथे सुरु असणाऱ्या कामाच्या ठिकाणी नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून पाईप जोडून कामाच्या ठिकाणी अंथरलेले असल्याचे आढळून येताच संपूर्ण पाईप आणि जोडणीचे सामान आपल्या ताब्यात घेतले आहे.

पालिका कर्मचारी कारवाई करताना

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes