बहिणीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला विचारणा करणाऱ्या भावाला मारहाण; दोघांना अटक

१७ वर्षीय बहिणाची छेडछाड करणाऱ्या तरुणाला विचारणा करायला गेलेल्या २२ वर्षीय भावाला त्या तरुणासह ४ लोकांनी मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी घडली आहे. मारहाणीत आरोपींनी लोखंडी रॉडसह ब्लेडचा वापर केला असल्याचेही उघडकीस आले आहे. नदीम, दाबर, सिकंदर आणि प्रशांत असे मारहाण करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. पवई पोलिसांनी शुक्रवारी दोन आरोपींना अटक केली असून, इतर दोघांचा शोध सुरु आहे.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीम, दाबर, सिकंदर आणि प्रशांत हे मरोळच्या बामनदाय पाडा येथे राहणाऱ्या तक्रारदार तरुणी रेशमाचा (बदललेले नाव) पाठलाग करत असत. १७ डिसेंबरपासून येथील बस थांब्याजवळ आणि उद्यानाजवळ तिच्यावर अश्लील शेरेबाजी तरुणांनी केली होती.

नदीम जवळपास २ महिने माझा पाठलाग करत होता. एक दिवस मला अडवून त्याने “मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझा नंबर दे” अशी माझ्याजवळ मागणी केली. त्याचे मित्र त्यावेळी तिथेच उपस्थित होते जे माझ्यावर हसत होते, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात रेशमाने म्हटले आहे. याची माहिती रेशमाने आपल्या पालकांना दिल्यानंतर तिच्या भावाने या गँगला माझ्या बहिणीचा पाठलाग करू नका आणि तिला सतावू नका, नाहीतर तुमच्या विरोधात मला पोलिसांना तक्रार करावी लागेल असा समज जानेवारी महिन्यात तरुणांना दिला होता.

१५ – २० दिवस सगळे शांत होते, मात्र २ फेब्रुवारीला कॉलेजला जात असताना तरुणांनी पुन्हा रेशमाला गाठले. नदीमने तू तुझ्या भावाला का सांगितलेस? असा तिला धमकावण्याचा प्रयत्न करताच तिने तिथून पळ काढून आपल्या पालकांना सर्व घडला प्रकार सांगितला.

गुरुवारी रेश्माला तिच्या भावाने फोन करून त्या तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला असून, जबर जखमी केले असल्याचे सांगितले. तिने आईसोबत घटनास्थळी धाव घेऊन भावाला रुग्णालयात दाखल केले.

‘तरुणीने शुक्रवारी आमच्याकडे येऊन नोंदवलेल्या जवाबाच्या आधारावर भादंवि कलम ३५४ डी (चोरी करणे), ३२४ (स्वैच्छिकपणे धोकादायक शस्त्रे किंवा तत्सम माध्यमांद्वारे दुखापत करणे), ३२३ (दुखापत करणे), ५०४ (शांततेचा भंग करण्याचा हेतूने अपमान करणे) आणि ३४ (एकाच उद्देशाने एकपेक्षा जास्त लोकांनी मिळून केलेले कृत्य) पोक्सो कायदा कलम ८ (लैंगिक अत्याचार) आणि १२ (अल्पवयीन मुलीशी लैंगिक छळवणूक) नुसार गुन्हा नोंद करून गुन्ह्यात सहभागी दोन तरुणांना अटक केली आहे. पाहिजे आरोपींचा शोध सुरु असून त्यांच्या विरोधात यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद आहे.’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!