चोरट्यांनी पोलीस ठाणेच्या बाजूची ४ दुकाने फोडली; २.३१ लाखाची रोकड पळवली

पवईतील विविध भागात चोऱ्या करणाऱ्या चोरट्याने शुक्रवारी रात्री चक्क पवई पोलीस ठाणेला लागून असणाऱ्या रामबाग येथील ४ दुकानांना फोडत २.३१ लाखाची रोकड पळवली. चोरीच्या घटनांमध्ये पवई भागात वाढ झालेली असतानाचा, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चोरट्यांने मोठे धाडस करत पोलीस ठाणेच्या बाजूच्या दुकानांमध्ये चोरी करून पवई पोलिसांना एक मोठे आव्हान दिले आहे. रामबाग येथील जागनाथ हार्डवेअर स्टोअर, महालक्ष्मी किराणा स्टोअर, आईजी सुपर मार्केट आणि उमरा कॉम्पुटर, स्टेशनरी आणि झेरोक्स सेंटर येथे चोरट्याने डल्ला मारला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, १ जानेवारी २०२१ला नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता ही सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. “आम्ही सकाळी दुकान उघडण्यास आलो असताना आमच्या दुकानाच्या शटरची लॉकची कडी कट केली असल्याचे लक्षात आले. आत जावून पाहिले असता चोरट्याने दुकानाच्या आत प्रवेश करून गल्ल्यातील रोकड पळवली होती,” असे याबाबत बोलताना किराणा स्टोअरच्या मालकाने आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

“याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस चौकशीसाठी जेव्हा तिथे पोहचली तेव्हा आसपासचीही दुकाने फोडली गेली असल्याचे लक्षात आले. आमच्या दुकानात घुसून सुद्धा चोरट्यांनी गल्ल्यातील १५ हजाराची रोकड चोरी केली आहे, असे याबाबत बोलताना झेरोक्स सेंटरचे मालक विनोदकुमार कांबळे यांनी सांगितले.

“चोरट्यांनी रात्री ३ ते ३.४५ च्या दरम्यान डाव साधला आहे. चोरीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही मिळवले असून, तपास सुरु आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“हार्डवेअरच्या दुकानातून चोरट्यांनी १.९० लाखाची रोकड, आयजी सुपर मार्केटमधून २५ हजाराची रोकड आणि चांदीचे पैंजण, उमरा झेरोक्स सेंटरमधून १५ हजाराची रोकड आणि महालक्ष्मी स्टोअरमधून १ हजाराची रोकड अशी २.३१ लाखाच्या मुद्देमालावर चोरट्याने हात साफ केला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी फक्त गल्ल्यात असणारी रोकडच पळवली आहे.” असेही याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

टाळेबंदीच्या काळात आणि अनलॉकपासून पवईच्या विविध भागात चोरट्यांनी आत्तापर्यंत धुमाकूळ घालत अनेक घरे आणि दुकाने फोडली आहेत. पवई पोलिसांनीही कसून तपास करत यातील अनेक चोरट्यांना बेड्या ठोकत तुरुंगाची हवा खायला लावलेली आहे. मात्र, आता चोरट्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठे धाडस करत चक्क पोलीस ठाण्याला लागून असणाऱ्या दुकानांना फोडत पवई पोलिसांना एक आव्हान दिले आहे.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!