पवईत खाजगी बसचा अपघात, १ ठार १७ जखमी

रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण

मालाड येथून मुंब्रा येथे लग्नाच्या रिसेप्शनला जाणाऱ्या एक खाजगी बसचा ट्रिनीटी चर्चजवळ भीषण अपघात झाल्याची घटना काल दुपारी पवईमध्ये घडली. या घटनेत बसमधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत. ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पार्कसाईट पोलिसांनी यावेळी बोलताना दिली. यासंदर्भात पोलिसांनी घटनास्थळावरून पसार झालेल्या बसचालका विरोधात भादवि कलम २७९, ३०४ (ए), ३३७, ३३८ गुन्हा नोंद करून त्याचा शोध सुरु केला आहे.

स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात घेवून जाताना (छायाचित्र: पवई पोलीस मित्र ग्रुप)

शुक्रवारी लग्न झालेल्या एक नवविवाहित जोडप्याचे शनिवारी मुंब्रा येथे रिसेप्शन असल्याने, मुलीकडील वराडी मंडळी मलाड येथून दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास एम एच ०४ जी ९०१७ या खाजगी बसने तिकडे जाण्यासाठी निघाले होते. बस आयआयटी मार्केट येथून वळण घेवून पुढे जात असताना गाडीच्या चालकाचा बसवरचा ताबा सुटल्याने बस दुभाजकाला जावून आदळून उलटली.

मि व माझे दोन मित्र विकी आगाशे आणि डेविड नाडार घराजवळच बसलो होतो. काहीतरी जोरात आवाज झाल्याचे ऐकून आम्ही तिकडे धावलो तर एक सफेद रंगाची बस आडवी पडली होती. माणसे अडकून पडली असल्याचे बघून आम्ही धावत जावून ज्या मार्गाने जमेल त्या मार्गाने बसमधील लोकांना बाहेर काढले. जवळपास ४० लोक त्या बसने प्रवास करत होते.” असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिक व प्रत्यक्षदर्शी प्रतिक वानखेडे याने सांगितले.

जखमींच्या मदतीसाठी धावून आलेला प्रतिक वानखेडे

घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहचलेल्या पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना पवई, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी ५ लोकांची स्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातात बसची इंधन टाकी फुटून संपूर्ण रस्त्यावर ऑईल सांडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी यावेळी निर्माण झाली होती. या वाहतूक कोंडीचे लोन पूर्वधृतगती महामार्गावर पोहचल्याने या मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची सुद्धा चांगलीच कोंधी झाली होती. संध्याकाळी ३.३० वाजता क्रेनच्या सहय्याने बसला रस्त्यातून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

बसचालक पहिल्यापासूनच बस भरदाव चालवत होता, आयआयटी येथील वळणावर त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आदळून हा अपघात घडला असल्याचे पोलीस जवाबात प्रवाश्यांनी सांगितले. अपघातात इम्तियाज शेख (४०) याचा जागीच मृत्यू झाला, तर अनेकजन गंभीर जखमी झाले आहेत. बसचालक सनोज निशाद हा अपघातानंतर तेथून पसार झाला असून, पार्कसाईट पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!