पंचसृष्टी रोडच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा नारळ फुटला; मंगळवारपासून कामाला सुरुवात

केवळ हलकी वाहने आणि स्थानिक रहिवाशांच्या वाहनांना या मार्गावरून जाण्यास अनुमती असणार आहे. इतर वाहतूक डीपी रोड क्रमांक ९वरून वळवण्यात आली आहे.

पंचसृष्टी रोडच्या विकास कामाचा नारळ फोडल्याच्या वर्षभरानंतर अखेर या कामाला मुहुर्त लागला असून, मंगळवारपासून रोडच्या कामाची सुरुवात होणार आहे. चांदिवलीकडून हिरानंदानीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर (पश्चिम भागात) या कामाची सुरुवात होणार असून, केवळ हलकी वाहने आणि स्थानिक रहिवाशांच्या वाहनांनाच या मार्गावरून जाण्यास अनुमती असणार आहे. इतर वाहतूक डीपी रोड क्रमांक ९वरून वळवण्यात आली आहे.

रविवारी शिवसेना सचिव आणि सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्ष आदेश बांदेकर, स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे आणि पंचसृष्टी कॉम्प्लेक्स रहिवाशांच्या हस्ते भूमिपूजन आणि नारळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार लांडे यांनी पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

वर्षानुवर्ष विकासक आणि पालिका यांच्या अनुमतीत अडकून दुरावस्थेत पडलेल्या पंचसृष्टी रस्त्याला स्थानिक नागरिक आणि आवर्तन पवईच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर संजीवनी मिळाली आहे. या संदर्भात आवर्तन पवईने १८ एप्रिलला ‘मामा आमच्या रोडचा मुहुर्त कधी?’ या मथळ्याखाली बातमी करत आमदारांचे याकडे लक्ष वेधले होते. ज्याच्या उत्तरादाखल शाळांना सुट्ट्या लागताच काम सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. अखेर चांदिवली विधानसभा आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या प्रयत्नातून गुंडेचा हिल इमारत ते शिवभक्तांनी कॉम्प्लेक्स या मार्गावर सिमेंट कॉंक्रीट रोडच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे.

चांदिवली आणि हिरानंदानी परिसराला पंचसृष्टी कॉम्प्लेक्स परिसरातून जाणारा रस्ता हा सगळ्यात मोठा दुवा आहे. मात्र विकासक आणि पालिका यांच्या पूर्तता आणि मंजुऱ्या यात अडकून पडल्याने जवळपास २ दशकापासून हा रस्ता दुरावस्थेत पडला आहे. नागरिक वर्षानुवर्ष खड्डयातून आणि खराब मार्गानेच प्रवास करत असतात. यापूर्वीही त्यावेळचे स्थानिक आमदार, नगरसेवक यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले होते, मात्र काहीच दिवसात परिस्थिती पूर्ववत झाली होती.

“रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक नागरिक या परिसरात राहण्यास येण्यास टाळत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास होता. आम्ही वर्षानुवर्ष याचा पाठपुरावा करत आहोत. अखेर आमदार दिलीप मामा लांडे यांच्या माद्यमातून रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांना नक्की दिलासा मिळेल,” असे याबाबत बोलताना पंचसृष्टी फेडरेशनचे अध्यक्ष इंद्रनील चटर्जी म्हणाले.

“या परिसरात राहणाऱ्या लोकांची रस्ता बनवताना गैरसोय होणार नाही आणि त्यांची आवश्यकता विचारात घेत दीर्घकाळ टिकेल अशा प्रकरचा रस्ता बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे,” लांडे म्हणाले.

ते पुढे म्हणाले “या मार्गावर असणारी वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु असून, लवकरच चांदिवली आणि हिरानंदानी परिसराला जोडणारे अजून काही मार्ग नागरिकांसाठी खुले करण्यात येतील. रस्ता निर्मितीच्या कामासोबतच ड्रेनेज लाईन आणि स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम करण्यात आले आहे.”

यावेळी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, “शिवसेनाप्रमुख हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मताचे राजकारण नाही तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याची शिक्षा दिली आहे आणि आम्ही नेहमीच जनतेच्या हिताचे काम करण्यास आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देवू.”

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!