अलिशान इमारतीसाठी चांदिवलीत ६५ झाडांवर कुऱ्हाड

एका नामांकित विकासकाच्या आलिशान इमारतींला आड येणाऱ्या वृक्षांची कत्तल करण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने दिली परवानगी

tree colaps1

संग्रहीत छायाचित्र

चांदिवली येथील डी मार्ट जवळील मोक्याच्या ठिकाणी एका नामांकीत विकासकाच्या उभारण्यात येणाऱ्या गगनचुंबी इमारती आड येणारी तब्बल ६५ झाडांची कत्तल करण्याची परवानगी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने दिली आहे. यामध्ये आंबा, नारळ, चिकू पेरू आदी झाडांचा समावेश आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे विकासकाला आलिशान इमारती उभारण्यामधील अडसर दूर झाला असला तरी स्थानिक पर्यावरण प्रेमी याला आपला विरोध दर्शवत आहेत.

पालिकेच्या परवानगीशिवाय झाड तोडणे हा गुन्हा आहे. मुंबईमध्ये सरकारी कामांसाठीच नव्हे तर धनदांडग्या विकासकांसाठी सुद्धा झाडांची कत्तल करण्याची परवानगी सहज मिळून जाते असे यातून दिसून येते. सामन्यांच्या घरांवर, इमारतींवर कललेल्या किंवा कोणत्याही क्षणी घरावर कोसळणाऱ्या झाडांना तोडण्यासाठी किंवा फांद्या छाटण्यासाठी सामान्य माणसाला मात्र आपली पादत्राणे झिजवावी लागतात, मात्र त्यानंतरही महिनोंमहिने पालिकेकडून परवानगी मिळत नाही. दुसरीकडे विकासकांच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या मोठमोठय़ा वृक्षांची कत्तल करण्यास मात्र वृक्ष प्राधिकरणाकडून सहजरित्या हिरवा कंदिल दाखविला जातो.

चांदिवली येथील डिमार्ट परिसरात नामांकित बिल्डरमार्फत आलिशान इमारती उभारण्यात येत आहेत. या इमारतींच्या आड ६५ वृक्ष येत आहेत. आंबा, नारळ, पेरू, चिकू आदी झाडांचा यात समावेश आहे. हे वृक्ष तोडण्यास परवानगी मिळावी म्हणून विकासकांनी पालिकेकडे अर्ज दाखल केला होता. पालिका उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत मोठय़ा तत्परतेने छाननी करुन, वृक्षतोडीबाबतचा प्रस्ताव तयार करून वृक्ष प्राधिकरण समितीकडे सादर केला. वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत तात्काळ हा प्रस्ताव मंजूर केला गेला आहे, त्यामुळे आता येथील ६५ झाडांवर लवकरच कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे.

येथील विकासकामात आड येणाऱ्या ६५ पैकी ४६ वृक्षांची कत्तल करण्यात येणार असून, १९ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. विकासकाने पुढील तीन वर्षात परिसरात वृक्षारोपण करणार असल्याचे शपथपत्रही सादर केले आहे.

यासंदर्भात आवर्तन पवईशी बोलताना स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमींनी सांगितले, “नियमानुसार विकासकामाच्या आड येणाऱ्या झाडांवर सूचना लावणे आवश्यक आहे. स्थानिकांनी त्याला विरोध दर्शवला नाही तरच पालिका त्यांना तोडण्याची परवानगी देवू शकते. मात्र या झाडांवर असे कोणत्याही सूचना लावल्याचे आम्ही स्थानिकांनी पाहिलेले नाही. पालिका वृक्ष प्राधिकरण विभागाला हाताशी धरून, परवानगी मिळवून विकासक राजरोसपणे झाडांची कत्तल करत आहे.”

ते पुढे म्हणाले “पुनर्रोपण केलेल्या वृक्षांचे पुढे काय होते हे पाहण्याची यंत्रणा पालिकेकडे उपलब्ध नाही आहे, त्यामुळे पुनर्रोपण करण्यात येणाऱ्या १९ वृक्षांचे भवितव्यही धोक्यातच आहे. विकासकाने शपथपत्र दिले असले तरी ते वृक्षारोपण करतील कशावरून”

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!