चांदिवली मर्डर केस: संपत्तीच्या वादातून भावानेच केली भावाची हत्या; आरोपी भावाला अटक

चांदिवली संघर्षनगर येथील एका खोलीच्या वादातून आपल्याच मावस भावाचा खून करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. राहुल शहा (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव आहे.

साकीनाका येथील चांदिवली फार्म रोडकडून संघर्षनगरकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या एमसीजीएम पार्क जमीन भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत कोपऱ्यात पडल्याचा येथील पर्यवेक्षक सदानंद यादव यांना १३ नोव्हेंबरला आढळून आला होता. या संदर्भात त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवताच साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला होता.

“मृतदेहाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्याच्या कपड्यात त्याची ओळख पटेल असे काहीच सामान आम्हाला मिळून आले नव्हते, त्यामुळे त्याची ओळख पटवणे खूप अवघड होते. सीसीटीव्हीत सुद्धा काहीच मिळून येत नव्हते”, असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले ‘काहीच धागेदोरे हाती नसल्याने आम्ही आमच्या खबऱ्याना कामाला लावले होते. त्याच्या अंगात केवळ बनियान आणि ट्रॅक पॅण्ट असल्याने तो जवळपास राहणारच असावा अशी आमची खात्री होती.”

खास खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर साकीनाका पोलिसांनी संघर्षनगर येथे राहणारा राहुल शहा याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्यानेच आपला मावस भाऊ दुर्गेश उर्फ आनंदमोहन जैस्वाल (२९) याची चाकूने भोकसून हत्या केली असल्याची कबुली दिली.

“चांदिवली संघर्षनगर येथील एका फ्लॅटच्या मालकीवरून दोघांच्यात वाद होता. या फ्लॅटवर माझाही अधिकार आहे, तसेच या खोलीतून मिळणाऱ्या भाड्यातून मलाही रक्कम मिळायला हवी अशी राहुल याची मागणी होती.” असे याबाबत बोलताना परिमंडळ दहाचे उपायुक्त अंकित गोयल यांनी सांगितले.

या वादातूनच १० नोव्हेंबरला दोघांच्यात मोठे भांडण झाले असताना राहुलने रागाच्या भरात चाकूने दुर्गेशवर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. रात्रभर त्याचा मृतदेह तसाच लपवून ठेवत पहाटे त्याने एमसीजीएम पार्क येथील निर्जनस्थळी फेकून दिला होता, असे तपासात समोर आले आहे.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!