कोझिकोडे एअर क्रॅशमध्ये चांदिवली येथील पायलट दिपक साठे यांचा मृत्यू

काल एअर इंडियाच्या एका विमानाचा केरळ येथील करिपूर विमानतळावर अपघात झाला. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला असून, विमानाचे मुख्य वैमानिक दिपक साठे यांचाही मृत्यू झाला आहे. चांदिवलीमधील नहार कॉम्प्लेक्स मधील रहिवाशी असणारे साठे हे कुशल वैमानिक होते. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबासह चांदिवली आणि पवईकरांवर शोककळा पसरली आहे.

साठे यांच्या पश्चात पत्नी सुषमा, मुले शंतनू, धनंजय यांच्यासह सुना असा मोठा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले सध्या परदेशात असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाव्हायरस (साथीच्या रोगाचा) आजाराच्या पार्श्वभूमीवर हे विमान ‘वंदे भारत’ कार्यक्रमाचा एक भाग होते, जे परदेशातून भारतीयांना परत आणण्याचे काम करत होते. दुबई – कोझिकोड एअर इंडिया एक्सप्रेस विमान करिपूर विमानतळाच्या रनवे नंबर १०वर उतरल्यानंतर दरीत कोसळले आणि त्याचे दोन तुकडे झाले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

नागरी उड्डाण मंत्रालयाचे प्रवक्ते राजीव जैन यांनी सांगितले की, या विमानात १९१ प्रवासी होते. ज्यात १७४ प्रौढ प्रवासी, १० शिशु, दोन पायलट आणि चार केबिन क्रू होते. एव्हिएशन रेग्युलेटरने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

साठे हे गेल्या १५ वर्षांपासून एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होते. भारतीय वायुसेनेतून विंग कमांडर म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर ते एअर इंडियामध्ये रुजू झाले होते. नॅशनल डिफेन्स अकॅडमीतून त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. बोईंग ७३७ विमान उडवण्याचा त्यांना खूप अनुभव होता. १२७ पायलट कोर्सचा भाग असणाऱ्या साठे यांना दुंडीगलच्या एअर फोर्स अ‍ॅकॅडमीमध्ये कोर्समध्ये टॉप केल्याबद्दल ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ (मानाची तलवार) देण्यात आली होती.

साठे आपल्या कुटुंबासह ५ वर्षापूर्वी पवईतील जलवायू विहार येथून नहार येथील झेनिया इमारतीत शिफ्ट झाले होते. “ते खूपच मनमिळाऊ स्वभावाचे होते. मुंबईत घरी असत तेव्हा दिवसातून एकदातरी खाली फिरायला येत असत. त्यांनी येथे खूप मित्र बनवले आहेत.” असे याबाबत बोलताना येथील रहिवाशांनी सांगितले. आज त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या जाण्याची हळहळ व्यक्त केली.

साठे यांचे आई-वडिल हे नागपूरात राहत आहेत. आपला मुलगा देशाला समर्पित झाल्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी भावना दिपक साठे यांच्या आई निलाबाई साठे यांनी यानंतर व्यक्त केली.

साठे यांचे भाऊ सुद्धा सैन्यदलात होते. त्या दोघांचाही या १९८२-८३ साली वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले होते. त्या अपघातातून सावरत साठे पुन्हा आपल्या कर्तव्यावर परतले होते

चांदिवली सिटीझन्स वेलफेअर असोसिएशनसह पवईतील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवी संस्था यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याला नमन करतानाच त्याच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्याच्या कुटुंबियांना धैर्य मिळावे अशी प्रार्थना केली आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!