चांदिवलीकर करतायत प्रदूषणाच्या राक्षसाशी सामना

जवळपास ५००० घरे असलेल्या चांदिवली येथील नहार अमृत शक्ती वसाहतीमधील रहिवाशी प्रचंड वायू प्रदूषणाचा सामना करत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून रहिवाशी या प्रदूषणाचा अविरत सामना करत आहेत. प्रदूषणाचा स्रोत असणारी अनेक व्यावसायिक युनिट्स निवासी क्षेत्राच्या अगदी जवळ कार्यरत आहेत. ज्यांना पालिका किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी नाही, असे बेकायदेशीर युनिट्स बंद करण्यासाठी रहिवाशांनी अधिकाऱ्यांना अनेक पत्रे लिहिली आहेत. मात्र, कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही ज्यामुळे त्यांच्या माध्यमातून विषारी धूर पसरवत चांदिवलीला प्रदूषणाचे नरक बनवण्याचे काम सुरूच आहे.

मुंबईला ‘कचरामुक्त, प्रदुषणमुक्त आणि गतिमान मुंबई बनवूया, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबईकरांना केले आहे. याची अंमलबजावणी करतानाच मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका विविध उपाययोजना करीत आहे. मात्र तरीही चांदिवली भागात ही समस्या अजूनही तशीच आहे.

चांदिवलीत विशेषतः नहार अमृत शक्ती परिसरात दिवसभर जवळच असणाऱ्या अनेक कारखान्यांमधून विषारी धूर निघून परिसरातील दृश्यमानता जवळपास नष्ट झालेली असते. आसपासच्या भागात डोंगर असल्याने कारखान्यांतून निघणारा धूर हा वसाहतींमध्ये पसरत असतो, असे यासंदर्भात बोलताना चांदिवलीकरांनी सांगितले.

डिसेंबर महिन्यात चांदिवली रेसिडेंट असोसिएशनच्या सदस्यांनी पालिका ‘एल’ विभाग सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे यांची भेट घेत चांदिवलीतील विविध नागरी समस्यांसह परिसरातील वाढत्या प्रदूषणाची समस्या मांडली होती. यावेळी शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने समस्या सोडवण्यासाठी काम करण्याचे आश्वासन दिले होते.

या समस्येला घेवून स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी मुंबई महानगरपालिका सहआयुक्त अश्विनी भिडे आणि पालिका वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी विशेषतः नहार आणि चांदिवली भागात झपाट्याने वाढत असणाऱ्या प्रदूषणाकडे भिडे यांचे लक्ष वेधले होते.

मात्र, सर्व अधिकाऱ्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून केवळ तोंडी आश्वासने दिली जात आहेत. ते यावर कधी कारवाई करतील असे वाटत नाही, असेही याबाबत बोलताना चांदिवलीकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले “प्रदूषणामुळे अनेक रहिवाशांना सतत खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परिसरात कायमस्वरूपी मॉनिटरिंग स्टेशन स्थापित करावे ज्यामुळे रहिवाशांना दररोज कसा त्रास होतो हे सिद्ध होईल.”

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!