चांदिवलीतील समस्यांवर चांदिवलीकरांची पालिका ‘एल’ विभाग सहाय्यक आयुक्तांशी चर्चा

चांदिवलीतील नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांनी शुक्रवारी सहाय्यक आयुक्त पालिका ‘एल’ विभाग, महादेव शिंदे यांची भेट घेतली. असोसिएशनच्यावतीने मनदीप सिंग मक्कर, कुणाल यादव, योगेश पाटील आणि अमित सोनकर यांनी शिंदे यांची भेट घेवून, चांदिवली परिसरातील नागरी समस्या मांडल्या. डीपी रोड ९, खैरानी रोड आणि चांदिवली फार्म रोडवरील अतिक्रमणे हटवण्याची लेखी तक्रार देखील त्यांनी यावेळी सहाय्यक आयुक्तांना दिली.

यावेळी उपस्थित केलेल्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे आश्वासन देत टप्प्याटप्प्याने समस्येशी निगडीत विभागाचे संबंधित अधिकारी त्या परिसराला भेट देतील असे शिंदे यांनी आश्वासित केले.

चांदिवलीच्या वाढत्या नागरी समस्यांबद्दल लोकप्रतिनिधींच्या वारंवार निदर्शनास आणून देखील ते याकडे कानाडोळा करत असल्याने चांदिवलीकरांनी या समस्यांशी लढण्यासाठी कंबर कसली आहे. चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून चांदिवलीकर पालिका, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस यांच्याकडे सोशल माध्यमे, इमेल आणि लेखी पत्रव्यवहार करत यांचे या समस्यांकडे लक्ष वेधत आहेत.

“अस्वच्छ रस्ते आणि परिसर, वाहतूक कोंडी, अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमण अशा एक न अनेक साम्स्यांसोबत चांदिवलीकर सध्या लढत आहेत. लोकप्रतिनिधी तक्रारी ऐकून एकतर याकडे कानाडोळा करत आहेत किंवा लवकरच समस्या सोडवतो म्हणून प्रकरण लांबणीवर टाकत आहेत. “आम्ही लोकप्रतिनिधीना तक्रार केली तेव्हा त्यांनी २ दिवसात सोडवतो तर कोणी आठवडाभरात सोडवतो असे सांगितले होते. मात्र कित्येक महिने उलटून गेले तरी समस्या तशाच आहेत,” असे या संदर्भात बोलताना चांदिवलीकरांनी सांगितले.

“आमच्या परिसरातील अनेक समस्या या पालिकेशी निगडीत आहेत. यामुळे पालिकेकडे याचा योग्य पाठपुरावा केला तर बर्याच समस्या सोडवल्या जावू शकतात. म्हणूनच आम्ही पालिका सहाय्यक आयुक्त यांना भेटून आपल्या समस्या मांडल्या. त्यांनीही आमच्या समस्या पूर्णपणे ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,” असे मनदीप सिंग यांनी सांगितले.

यावेळी असोसिएशनने शिंदे यांना लेखी पत्र देत, डीपी रोड ९, खैरानी रोड आणि चांदिवली फार्म रोडवरील फुटपाथ आणि रोडवर रहिवाशांनी आणि अनधिकृत दुकानांनी केलेलं अतिक्रमण. डेव्हलपमेंट प्लानमध्ये असणाऱ्या चांदिवलीला जेविएलआरशी जोडणाऱ्या ९० फिट रोडच्या ‘प्रभाग क्रमांक १५८’मध्ये बनवण्यात आलेल्या भागात वाहने पार्क केली जात आहेत त्यामुळे या रस्त्याला लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा. परिसरातील अनेक भागात कचरा साफ होत नसल्याने कचऱ्याचे ढीग लागले आहेत. काही भागात कचऱ्याचे डबेच नाहीत. परिसरात वाढते प्रदूषण. परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी कामासाठी खोदकाम केल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे नियोजित नागरिकांच्या सल्ल्याने कामांचे नियोजन करावे, असे बऱ्याचश्या समस्या असोशिएशन मांडल्या.

सहाय्यक आयुक्त शिंदे यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्या एकूण घेत येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने समस्येशी निगडीत विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे निवारण करण्याचे आश्वासित केले. तसेच परिसरातील समस्या समजून घेण्यासाठी नागरिकांसोबत मिटिंगसाठी देखील त्यांनी सकारात्मकता दर्शवली.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!