नागरी समस्यांसाठी चांदिवलीकरांचा शांततापूर्ण मोर्चा

चांदिवली परिसरातील नागरी समस्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी करत असलेल्या टोलवाटोलवी आणि निष्काळजीपणा विरोधात चांदिवलीकर आक्रमक झाले असून, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे. १२ फेब्रूवारीला चांदिवली येथील नहार अम्रित शक्ती येथून, सकाळी ११ वाजता या शांतता मोर्चाची सुरुवात होईल. चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिअशनच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

पवईचा धाकटा भाऊ अशी ओळख असणाऱ्या चांदिवली परिसराला नेहमीच दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप येथील नागरिक करत असतात. पाठीमागील एका दशकात चांदिवलीचा झपाट्याने विकास झाला आहे. अनेक गगनचुंबी इमारती, वसाहती येथे निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रीय उद्यानातील हटवण्यात आलेल्या लोकांना झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत याच परिसरात वसवण्यात आले आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात या परिसरातील लोकवस्ती आणि लोकसंख्या वाढत असतानाच हा परिसर नागरी समस्यांसाठी आजही लढत आहे.

नादुरुस्त रस्ते, अतिक्रमण, अस्वच्छ परिसर, वायू आणि ध्वनी प्रदूषण, कचरा कुंड्या, वाहतूक कोंडी अशा एक ना अनेक समस्या सध्या येथील रहिवाशांना भेडसावत आहेत. “याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा केला असता केवळ आश्वासने मिळत आहेत. सोशल माध्यमांवर केलेल्या पाठपुराव्याला त्यांचे नियुक्त प्रतिनिधी मोगाम उत्तर देत आहेत ज्याची खुद्द लोकप्रतिनिधीना माहितीच नसते, असे चांदिवलीकरांनी याबाबत बोलताना आवर्तन पवईला सांगितले.

या संदर्भात अधिक बोलताना चांदिवलीकर म्हणाले, पालिका ‘एल’ विभाग हा बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सर्व विभागातील सर्वांत आळशी आणि निष्क्रिय असा विभाग आहे. अनेक नागरिकांनी कित्येक समस्यांना घेवून त्याच्याकडे पाठपुरावा केला आहे. मात्र हो कारवाई करू, किंवा संबंधित विभागाला कळवू या व्यतिरिक्त उत्तर आणि एक्शन काहीच दिसत नाही. “मी पालिकेला तक्रार करण्यासाठी घेतलेले मोबाईल ऐपच्या सहाय्याने समस्येचा फोटो टाकून टाकून थकले मात्र कारवाई मात्र झाली नाही. त्यामुळे वैतागून ऐपच डीलीट मारलेय. मात्र पालिकेच्या या ऐपमुळे समस्यांचे फोटो काढून काढून मी एक चांगली फोटोग्राफर झाले”, असे या संदर्भात बोलताना ऑलिव्ह डिसुझा म्हणाल्या.

पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या याच दिरंगाई आणि टोलवाटोलवीला कंटाळून चांदिवलीकरांनी आता मोर्चाचा मार्ग निवडला आहे. चांदिवलीला जेविएलआरशी जोडणाऱ्या ९० फुटी रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करा. विविध रस्त्यांवर आणि पदपथांवर असलेली अतिक्रमणे हटवा. सर्व नागरी समस्यांच्या तक्रारी आणि निवारणीसाठी एक खिडकी तयार करा. अशा मागण्या या शांतात मोर्चातून करण्यात येत आहेत.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!