जेव्हीएलआरवर आयआयटीजवळ कंटेनर पलटला, ३ तास वाहतूक कोंडी

दुभाजक ठरतोय अडथळा, यापूर्वीही या ठिकाणी अपघाताच्या, दुभाजकावर गाड्या चढल्याच्या अनेक घटना. स्थानिकांची दुभाजक हटवण्याची मागणी. पालिका – वाहतूक विभाग यांची टोलवाटोलवी.

आज (गुरुवार, १९ सप्टेंबर) पहाटे सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर आयआयटी मेनगेट येथे एक कंटेनर (एमएच ४६ एफ ४९७१) पलटल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत कंटेनर चालकाने बाहेर उडी मारल्यामुळे तो बचावला. मात्र कंटेनर संपूर्ण रस्त्यात आडवा झाल्याने गांधीनगरकडून सिप्झकडे जाणारी वाहतूक विस्कळीत होत, जवळपास ३ तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास कंटेनर हटवल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. मात्र ऐन कामावर जाण्याच्या वेळातच वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.

साकीनाका वाहतूक विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळेच येथे वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी बोलताना काही नागरिकांनी केला.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काच घेवून जाणारा कंटेनर क्रमांक एमएच ४६ एफ ४९७१ हा पहाटे गांधीनगरकडून सिप्झकडे निघाला होता. काल थांबून थांबून सुरु असणाऱ्या पावसामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर ओलसरपणा होता. त्यातच मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे रस्त्यावरील काही भागातील दुभाजके हटवण्यात आली आहेत. मात्र मेनगेटजवळ दुभाजक हटवले नसल्याचे कंटेनरचालकाच्या पटक लक्षात आले नसल्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला कंटेनरचा पाठीमागील भाग घासत गेल्याने तो रस्त्यावर पलटला. सुदैवाने कंटेनर चालक आणि क्लिनर वेळीच बाहेर पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत.

मात्र सकाळी मुंबईकरांच्या कामावर जाण्याच्या वेळीच आणि मुंबईतील सर्वात व्यस्त मानल्या जाणाऱ्या जेव्हीएलआरवर हा अपघात घडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मुख्य रस्त्यावरच कंटेनर अडवा झाल्याने सिप्झकडे जाणारी वाहतूक सर्विस रोडवरून कशीबशी चालू होती. मात्र जेव्हीएलआर पूर्वीपासूनच मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीत अडकलेला असताना, वाहतूक रोखली गेल्याने वाहतुक कोंडीची अजूनच मोठी समस्या निर्माण झाली होती.

अखेर सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास दोन क्रेनच्या साहय्याने कंटेनर उचलून बाजूला केल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

या संदर्भात बोलताना मुक्ताराम कांबळे यांनी सांगितले कि, ‘मेट्रोच्या कामामुळे या मार्गावरील दुभाजक हटवण्यात आले आहेत. मात्र मेनगेट समोर दुभाजकाचा काही भाग तसाच असल्यामुळे, रात्री प्रवास करणाऱ्या अनेक वाहनचालकांना अंदाज येत नाही. यापूर्वीही अनेक वाहने दुभाजकावर चढल्याच्या घटना घडल्या आहेत. पालिकेला ट्विटरवर (१३ ऑगस्ट आणि १८ ऑगस्ट) मी याची तक्रार केली असता पालिकेने मुंबई पोलिस, ट्राफिक विभाग आणि पालिका रोड विभाग यांना टॅगकरून याकडे लक्ष देण्यास सांगितले होते, मात्र काहीच घडले नाही.”

‘येथे कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसांना आम्ही दुभाजक अडथळा बनत असल्याची वारंवार तक्रारी केल्या आहेत मात्र त्यांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नाही,’ असेही याबाबत बोलताना काही नागरिकांनी सांगितले.

‘रस्त्याचे दुभाजक हटवणे हे वाहतूक विभागाचे काम नाही, ते पालिकेचे आहे. आम्ही पालिकेला सदर दुभाजक हटवण्याची वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केली आहे’, असे याबाबत बोलताना साकीनाका वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सकपाळ यांनी सांगितले.

पालिकेने साकीनाका वाहतूक विभागाकडून असा कोणताच प्रस्ताव आला असल्याचे नाकारले. ‘आम्ही वाहतूक विभाग आणि पालिका यांच्या संयुक्त चर्चेतून याबाबत आवश्यक तो निर्णय घेवू,’ असे याबाबत बोलताना पालिका अधिकारी भांबळे यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!