१३ लाखाची चोरी करून पसार झालेल्या कुकला रांचीमधून अटक

asdहिरानंदानी येथील व्यावसायिकाचे १३ लाख रुपये घेऊन पसार झालेल्या कुक (स्वयंपाकी) व साथीदाराला रांची येथून पकडण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. अनिल कुमार दास (२७) व दिनेश क्रीपलाल दास (२८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अनिल हा तक्रारदाराच्या घरी स्वयंपाक बनवण्याचे काम करत होता. क्राईम पेट्रोल कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन त्याने ही चोरी केली असल्याचे पोलीस चौकशीत कबूल केले आहे. याबाबत पवई पोलिसांनी भादवि कलम ४०८, ३४ सह गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.

तक्रारदार व्यावसायिक जैस्वाल हे आपल्या कुटुंबासह हिरानंदानी येथे राहतात. त्यांच्या घरी जेवण बनवण्यासाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी अनिल दास याला नोकरीस ठेवले होते. काही दिवसातच अनिल याने जैस्वाल परिवाराचे मन जिंकले. त्याच्यावर विश्वास ठेवून जैस्वाल अनेक आर्थिक व्यवहार सुद्धा करत असत.

जैस्वाल यांचे सासरे सुद्धा व्यावसायिक असून, कामानिमित्त मुंबईबाहेर जाताना ते नेहमीच आपल्या घरात असणारी रोख रक्कम जैस्वाल यांच्याकडे ठेवण्यास देत आणि परत आल्यावर त्यांच्याकडून घेत. पाठीमागील महिन्याच्या शेवटी सुद्धा जैस्वाल यांच्या सासऱ्याने १३ लाख रुपये बाहेर जाणार असल्याने अनिलच्या हातून पाठवले होते. मात्र रात्री उशिरा पर्यंत अनिल घरी न परतल्याने व त्याचा फोन लागत नसल्याने जैस्वाल यांनी पवई पोलीस ठाण्यात जावून तक्रार नोंद केली.

“आम्हाला तपासात अनिल त्या रात्री मुंबईत थांबून दुसऱ्या दिवशी सुरतला पळून गेला असल्याची माहिती त्याच्या एका नातेवाईकाने दिली. दुसऱ्या दिवशी तो सुरतमधून सुद्धा निघून गेला होता. अखेर तेथील नातेवाईकाने त्याचा नवीन वापरात असलेला नंबर आम्हास दिल्यानंतर, तो झारखंडमधील रांची येथे एका मानलेल्या बहिणीच्या घरी असल्याचे समजले. तिथे जावून आम्ही त्यास ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याने क्राईम पेट्रोल बघून हे कृत्य केले असल्याचे कबूल केले”, असे आवर्तन पवईशी बोलताना तपासी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक सुरज राऊत यांनी सांगितले.

पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हाडेश्वर म्हणाले, “अनिलने चोरीची रक्कम विविध नातेवाईकांकडे देवून त्यातील काही रक्कम नंतर त्याच्या खात्यात मागवून घेतली होती. तो आपली जागा सतत बदलत होता. आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे न-जाता मानलेल्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्याकडे जात होता, परंतु योग्य माहिती मिळवत आमच्या अधिकाऱ्यांनी अखेर त्याला व त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.”

दोन्ही आरोपींना पवई पोलिसांनी भादवि कलम ४०८, ३४ नुसार अटक केली असून, आतापर्यंत चार लाख दहा हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!