तीन रुग्णालयाने नाकारलेल्या गर्भवतीची त्यांनी घरीच केली प्रसूती

वैद्यकीय यंत्रणा कोरोना विषाणूंशी पूर्णपणे लढत असतानाच अनेकवेळा सामान्य नागरिकांना इतर उपचारांसाठी वैद्यकीय सुविधा मिळवताना मोठे खटाटोप करावे लागत आहेत. अशीच वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने नाविलाजास्तव घरात अडकून पडलेल्या गर्भवतीची एका डॉक्टरने घरीच प्रसूती करत तिला आणि बाळाला एक नवीन जीवनदान दिले आहे. डॉक्टर रविंद्र म्हस्के असे त्यांचे नाव असून, चांदिवली संघर्षनगर येथे ते आपली प्रक्टिस करत आहेत. कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असतानाही त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

अशीच वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने नाविलाजास्तव घरात अडकून पडलेल्या गर्भवतीची एका डॉक्टरने घरीच प्रसूती करत तिला आणि बाळाला एक नवीन जीवनदान दिले आहे.या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, चांदिवली येथील संघर्षनगरमध्ये राहणारी एक २४ वर्षीय गर्भवती महिला लॉकडाऊनमुळे घरातच असताना तिला ३ तारखेला ताप जाणवू लागला होता. उपचारासाठी तिने असल्फा घाटकोपर येथील मुक्ताबाई रुग्णालय गाठले. “तिला ताप असल्याने रुग्णालयाने तिला दाखल करून घेण्यास मनाई करत राजावाडी रुग्णालयात जाण्याची सूचना केली,” असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.

राजावाडी रुग्णालयात ती पोहचली खरी मात्र तिथे बेड नसल्याने तिला दाखल करून घेण्यात आले नाही. शिवाय तिला कोरोना तपासणी करून घेण्याची सूचनाही करण्यात आली. मात्र तिला जास्त त्रास जाणवत असल्याने तिने परिसरातील एक खाजगी रुग्णालय गाठले. मात्र त्या खाजगी रुग्णालयाने सुद्धा तिला दाखल करून घेण्यास स्पष्ट नकार दिला.

“आम्ही खूप विनंती केल्यावर रुग्णालयाने मोठ्या रकमेची मागणी करत तिला दाखल करून घेतो असे सांगितले, मात्र आमच्याकडे तेवढी मोठी रक्कम नसल्याने आम्ही सरळ घरी आलो,” असे याबाबत बोलताना नातेवाईकांनी सांगितले.

घरीच केली प्रसूती

“मी संध्याकाळी क्लिनिकवर असताना ४.३० – ५ वाजण्याच्या सुमारास मला तिच्या नातेवाईकांचा फोन आला. ती घरातच असून, तिला लेबर पेन आणि रक्तस्त्राव सुरु असल्याचे त्यांनी मला सांगितले. मी लगेच रुग्णवाहिकेची सोय करत तिकडे धाव घेतली. मात्र तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यास नेण्याची स्थिती नसल्याचे लक्षात येताच, तिच्या घरच्यांची झालेली अवस्था पाहता घरातच तिची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला” असे याबाबत बोलताना डॉ. म्हस्के यांनी सांगितले.

“सध्या बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. दोघांनाही कुठली लक्षणे जाणवत नाहीत. मी सर्व त्या खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असून, वेळोवेळी त्यांच्या आरोग्याची माहिती घेत आहे.” असेही डॉ. म्हस्के यांनी आवर्तन पवईशी बोलताना म्हणाले.

डॉक्टर म्हस्के यांचे वैद्यकीय शिक्षण आणि पुढील काळात संगमनेर येथील ग्रामीण भागात प्रक्टिस करताना डॉक्टर अशोक पोफळे यांचे मार्गदर्शन लाभले होते. डॉ. पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात काम करताना त्यांनी ३५० पेक्षा अधिक प्रसुतीचा अनुभव घेतला आहे. “हाच अनुभव या कठीण प्रसंगी माझ्या कामी आला” असेही ते म्हणाले.

कोरोना लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांना भीतीपोटी लांबूनच तपासणारे डॉक्टर एका बाजूला, तर प्रत्यक्ष रुग्णाच्या समोर जात सेवा देणारे डॉक्टर म्हस्के हे खरेच एक ‘कोरोना योद्धा’ असल्याची चर्चा सध्या चांदिवलीच्या जवळपास प्रत्येक नागरिकात आहे.

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामट्विटरयूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!