मुलींना फॉलो करून त्यांच्याकडे फोन नंबरची मागणी करणाऱ्या २ जणांना एक वर्षाची शिक्षा

मुलींचा पाठलाग केल्याबद्दल सत्र न्यायालयाने मंगळवारी दोन जणांना एक वर्षाचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

२५ नोव्हेंबर २०१३ रोजी एका पॅकेजिंग कंपनीत काम करणारी पीडित साकीनाका येथे कामावरून परतत असताना ही घटना घडली होती. तिच्या एका मैत्रिणीसोबत घरी जात असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याचे दोन्ही मुलींच्या लक्षात आले.

एका वडापावच्या स्टॉलवर मुली थांबल्या असताना पाठलाग करणारी दोन्ही मुले तिथे आली आणि मोबाईल नंबरची मागणी करत अश्लील भाषेत बोलू लागली. त्यानंतर मुली तिथून निघून दुसऱ्या ठिकाणी निघाल्या असता मुलांनी त्यांचा पुन्हा पाठलाग सुरू ठेवला. पुन्हा त्यांच्याकडे मोबाईल नंबरची मागणी करत जर त्यांनी नंबर शेअर केला नाही तर दुसर्‍या दिवशी पुन्हा त्यांचा पाठलाग करू अशी मुलींना धमकी दिली.

मुली पुढे चालत असतानाच एका बस स्टॉपवर त्यांना त्यांच्यापैकी एकीचा लहान भाऊ भेटला. मुलींने त्याला सगळा घडला प्रकार सांगितला असता त्याने लोकांच्या मदतीने त्यांना पकडून घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर मुलींनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

यासंदर्भात सुनावणी करताना न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, दोन्ही आरोपींचे वर्तन पुरेसे स्पष्ट होते की घटनेच्या दिवशी ते कार्यालयातून घरी जाताना पीडितेचा वारंवार पाठलाग करत होते. पीडितांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्याशी बोलण्यात किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्यात अनास्था दाखवली होती. त्यामुळे दोघांनाही गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्याची गरज आहे.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!