विजय विहार रोडवरून पवईत श्रेयवाद

विजय विहार समोरील भागात सुरु असणारे रस्त्याचे काम

पवईतील विजय विहार रोडवर सध्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असून, हा रस्ता आम्हीच दुरुस्त केला असल्याचा श्रेयवाद सध्या स्थानिक आमदार आरिफ नसीम खान आणि स्विकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांच्यात रंगला आहे. दोघांनीही हे काम आमच्याच प्रयत्नातून आणि फंडातून केला जात असल्याचा दावा केला आहे. श्रेयवादात यांचे कार्यकर्ते सुद्धा उतरले असून, सोशल माध्यमातून एकमेकांवर चिखलफेक करत कामाचे श्रेय आपल्या नेत्याचेच असल्याचा दावा ते सुद्धा करत आहेत.

आमदार नसिम खान परिस्थितीची पाहणी करून पालिकेला रस्ता दुरुस्तीचे पत्र देताना

मुंबईत पावसाला सुरु होण्यापूर्वीच पूर्व तयारी म्हणून रस्ते, नाले, गटारे यांच्या कामांना वेग येत असतो. पवई, चांदिवली भागात सुद्धा अशी अनेक कामे प्रत्येकवर्षी पावसाळ्यापूर्वी होताना नागरिकांना पाहायला मिळत असतात. यामुळे संपूर्ण पावसाळा नसला तरी, किमान पावसाळ्याचे सुरुवातीचे काही दिवस तरी पवईकर आणि चांदिवलीकर सुखाचा प्रवास अनुभवू शकतो. मात्र पवईतील विजय विहार कॉम्प्लेक्स समोरील रोड याला पूर्णपणे अपवाद आहे. या मार्गावरून उन्हाळा, हिवाळा, पावसाळा सगळ्याच ऋतूत लोकांना खड्यातूनच प्रवास करावा लागत असतो. कारण हा मार्ग खाजगी मालकीत असून, लवादातील रस्ता असल्याने पालिका येथे पुनर्निर्मिती किंवा दुरुस्तीचे काम करू शकत नाही.

स्विकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी पालिकेला दिलेले पत्र

विजय विहार रोड हा विजय विहारसह पवई विहार आणि लेकहोम या दोन मोठ्या कॉम्प्लेक्सना जोडतो. जेव्हीएलआर किंवा हिरानंदानीकडून येणाऱ्या वाहनांना हा एकमेव पर्याय असल्याने या कॉम्प्लेक्समध्ये येणा-जाणाऱ्या रहिवाशांना याच मार्गावरून प्रवास करावा लागतो. अशात दुरावस्थेत असणाऱ्या या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून सतत होत असते.

‘४ जूनला मी मनपा “एस” विभागाचे सहाय्यक अभियंता भरत केदारे आणि दुय्यम अभियंता सोनार यांच्यासोबत परिसराला भेट देवून पवई विहार, लेकहोम आणि विजय विहार येथील रहिवाशांच्या उपस्थितीत परिस्थितीची पाहणी केली होती. ज्यानंतर मी या रस्त्याला ६३के अंतर्गत घोषित करून रस्ता दुरुस्तीचे काम त्वरित करण्याची मागणी लेखी पत्र देवून केली होती. याच्या पाठपुराव्या अंती ९ जूनला रात्री डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली’ असे याबाबत बोलताना स्थानिक आमदार आरिफ नसिम खान यांनी सांगितले.

स्विकृत नगरसेवक यांनी मात्र खान यांच्या दाव्याला नाकारत ‘परिसरात पालिका सेन्ट्रल एजेन्सीतर्फे रस्त्यांच्या डागडुजीची आणि निर्मितीची कामे सुरु आहेत. आम्ही मे महिन्यात २४ तारखेला पालिकेला विजय विहार समोरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र दिले होते आणि याच मागणीनुसार पालिकेतर्फे हे काम केले जात आहे’ असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

स्थानिक नागरिकांकडून होणाऱ्या मागणीची दखल घेत स्थानिक प्रतिनिधी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी करत असतात. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम स्थानिक नगरसेवक, स्विकृत नगरसेवक आणि आमदार हे आम्हीच केले असल्याचे सांगत असल्याने नागरिक सुद्धा संभ्रमात पडले आहेत. हा सगळा श्रेयवादाचा खेळ केवळ येणाऱ्या निवडणुकीला ठेवून चालला असल्याचा आरोप सुद्धा नागरिकांकडून केला जात आहे.

आमदार नसिम खान यांचे आभार मानणारा परिसरात लावलेला बॅनर

‘६३के अंतर्गत रस्त्यावर मुंबई महानगरपालिका कायद्यानुसार काम करत असताना १/३ भाग हा नगरसेवक/आमदार/खासदार यांच्या फंडातून वापरला जात असतो, तर २/३ भाग हा पालिका फंडातून वापरला जात असतो.’ असे याबाबत बोलताना नाव जाहीर न-करण्याच्या अटीवर पालिका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नगरसेवक यांच्या कार्यकर्त्याकडून समाज माध्यमात केला जाणारा दावा

, , , , , , , , , , , , , , ,

One Response to विजय विहार रोडवरून पवईत श्रेयवाद

 1. Amol Chavan June 14, 2019 at 3:04 pm #

  *जसे कामाच श्रेय घ्यायला भांडण करताय तसच या पावसात हा रस्ता वाहून गेल्या वर पण श्रेय घ्यायला मागे पूढे पाहू नका …*
  आता सारखेच तेंव्हा पण ताकदीने भांडा ..
  कारण या रस्त्याची फक्त दूरूस्तीच झालीय नव्यान बांधलेला नाही तेंव्हा लवकरच हा रस्ता या पावसात वाहून गेला नाहीतर नवलच असो पण *वैशाली पाटील* चांगल काम करतायत ..
  स्थानिक आमदारांची ही चौथी टर्म आहे आता परीयंत चांगला *सि.सी. रोड* बांधला असता तर एवढी भांडायची वेळच आली नसती …
  *सर्वांना शुभेच्छा.*💐💐💐
  *आणी दूरूस्ती केलेला रस्ता हा पावसाळा काढेल एवढीच माफक अपेक्षा*🙏🙏

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes