पवई तलावात पुन्हा मगर दर्शन

मुंबईच्या पर्यटन स्थळांपैकी एक असणाऱ्या पवई तलावाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथे असणाऱ्या मगरी. पाठीमागील काही वर्षापासून त्यांचे येथील दर्शन दुर्लभ झाले होते, मात्र काही दिवसांपूर्वी पवई तलावावर पुन्हा एकदा मगरीचे दर्शन घडले.

पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरी असल्याचे सांगितले जाते. आयआयटी मुंबईतील पवई तलाव जवळील परिसर, रेनिसंस हॉटेलजवळील भाग, पवई उद्यानातील तलावाला लागून असणारा भाग अशा अनेक ठिकाणी या मगरींचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. तसेच तलावात असणाऱ्या छोट्या छोट्या टेकड्यांवर मगरींचे अधूनमधून दर्शन घडत असे. मात्र पाठीमागील काही वर्षात पवई तलावाच्या होत चाललेल्या दुर्दशेमुळे आणि यातील अनेक टेकड्या नष्ट झाल्याने मगरींचे दर्शन दुर्लभ झाले आहे. मात्र आता पवई तलावातील जलपर्णी हटवण्याच्या कामाला सुरुवात झाल्यापासून मगरींचे दर्शन पुन्हा घडू लागले आहे.

सोशल मिडीयावर सध्या एक व्हिडीओ फिरत असून, या व्हिडीओमध्ये एक मगर तलावातील टेकडीवर बसून उन्हाचा आनंद घेताना आढळून येत आहे. काही वेळाने कदाचित कोणीतरी तिच्या आसपास असल्याचा तिला अंदाज आल्याने ती पाण्यात निघून जाताना दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मिडियात फिरत असल्याने हा व्हिडीओ नक्की कोणी आणि कधी काढला आहे हे समजले नसले तरी हा व्हिडीओ पवई तलावातीलच असल्याचे पर्यावरण प्रेमींनी खात्रीशीर सांगितले. तलावात असणाऱ्या जलपर्णी व्हिडीओमध्ये दिसत नसल्याने तो अलीकडच्या काळातच काढला असल्याचे दिसत आहे.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!