ओएलएक्सवर सामान विक्रीसाठी ठेवलेल्या दोन पवईकरांना सायबर चोरांचा ८५ हजाराचा गंडा

ओएलएक्सवर आपल्या घरातील जुने फर्निचर आणि गादी विक्रीसाठी जाहिरात करणाऱ्या दोन पवईकरांना बनावट ग्राहक बनून सायबर चोरांनी ८५ हजाराला गंडवल्याचा प्रकार आज (शनिवारी) पवईत उघडकीस आला आहे. पवई पोलीस माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत.

आयआयटी मुंबई येथे कार्यरत असणारे सनी सदाना (३५) हे आपल्या परिवारासह पवईतील विजय विहार येथे राहतात. त्यांच्या पत्नीने घरातील जुने फर्निचर ऑनलाईन खरेदी-विक्रीचे व्यवहार चालणाऱ्या ओएलएक्स साईटवर विक्रीसाठी टाकले होते. शनिवारी सकाळी सर्व घरी असताना त्यांच्या पत्नीला एका इसमाने फोन करून आपली ओळख अनंत कुमार असल्याचे सांगत, त्यांनी विक्रीसाठी ओएलएक्सवर टाकलेल्या फर्निचरला विकत घ्यावयाचे असल्याचे  सांगितले.

पत्नीने त्याच्याशी बोलण्यासाठी माझ्याकडे फोन दिला तेव्हा त्याने मला ४०,००० रुपयांना ते फर्निचर घेण्यास इच्छुक असल्याचे सांगत माझ्याकडे गुगल पे ऍप आहे का अशी विचारणा केली. मी असल्याचे सांगताच त्याने मला मी तुमच्या पत्नीच्या व्हाट्सऍपवर एक  युपीआय क्यूआर कोड पाठवत असून, माझ्याकडील ऍपद्वारे त्याला स्कॅन करण्यास सांगितले, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात सदाना यांनी म्हटले आहे.

“सदाना यांनी कोड स्कॅन करताच त्यांच्या खात्यातून ५ रुपये वजा होत १० रुपये खात्यात जमा झाल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर त्यांना प्राप्त झाला. खरेदीदाराने पुन्हा त्यांना एक कोड पाठवून स्कॅन करायला सांगितले असता १०,००० रुपये त्यांच्या खात्यातून वजा झाले. सदाना यांनी याबाबत विचारणा केली असता चुकून झाले असल्याचे सांगत त्याने अजून एक कोड पाठवला त्याला स्कॅन करताच अजून १०,०००  खात्यातून वजा झाल्याचा संदेश त्यांना प्राप्त झाला. तुम्हाला मी २०,००० परत करत आहे सांगून अजून एक कोड पाठवला यावेळी त्यांच्या खात्यातून पुन्हा २०,००० वजा झाल्याचा संदेश त्यांना प्राप्त झाला.

विविध ५ ट्रॅन्जेक्शनच्या सहाय्याने ८० हजार रुपये खात्यातून वजा झाल्याने समोरील व्यक्ती त्यांची फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच सदाना यांनी फोन कट करून बँकेला याबाबत माहिती देत पवई पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या एका घटनेत रहेजा विहार येथे राहणारे समरनाथ चौधरी (५१) यांनी याच साईटवर गादी विक्रीसाठी जाहिरात केली होती. ही गादी आपल्याला विकत घ्यावयाची असल्याचे सांगत एका इसमाने त्यांना क्यूआर कोड पाठवून त्यांच्या खात्यातून ५ हजार रुपये लांबवले.

“दोन्ही गुन्ह्यात आम्ही माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे”, असे याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब रोकडे यांनी सांगितले.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!