पवई तलाव भागात तरुणावर प्राणघातक हल्ला; एकाला अटक, दोघांचा शोध सुरु

जखमी तरुण

पवई तलाव भागात तरुणीला छेडछाड करणाऱ्या तरुणांना रोखणाऱ्या एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना काल रात्री ७.३० वाजता पवई परिसरात घडली आहे. रोहित बावधाने असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पवई पोलिसांनी भादवि कलम ३२६ नुसार गुन्हा नोंद करून, हल्ला करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहेत.

पवई तलाव हे मुंबईकरांच्या प्रमुख पर्यटना स्थळासोबतच तरुणाईचे आणि प्रेमी युगुलांचे हक्काचे ठिकाण बनले आहे. तलाव भागात आलेल्या या प्रेमी युगुलांच्या अश्लील चाळ्यांमुळे सामान्य नागरिक त्रस्त असून, या भागात फिरायला येणे टाळत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. सोबतच तरुणाच्या या चाळ्यांमुळे मोठा गुन्हा घडण्याची शक्यताही नागरिकांनी वर्तवल्या आहेत.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका महिलेवर सामुहिक बलात्काराची घटना सुद्धा या परिसरात घडली होती. या गुन्ह्यात महिलेच्या एका मित्राला पवई पोलिसांनी अटक केली होती. मात्र इतर गुन्हेगारांबाबत अजूनही काहीच सुगावा लागलेला नाही.

सामुहिक बलात्काराची घटना घडून दोन आठवडे झाले नसतील की काल, गुरुवार १३ जूनच्या रात्री एका तरुणावर काही तरुणांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे येथे राहणारा रोहित भावदाने (२३) हा पवई तलाव परिसरात फिरण्यासाठी आला होता. येथे काही तरुण एका तरुणीची छेडछाड काढत असल्याचे निदर्शास येताच त्याने त्यांना अटकाव करत रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या तरुणांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली.

‘मारहाण सुरु असतानाच एका तरुणाने धारदार शस्त्र काढून त्याच्या पोटावर त्याने हल्ला करत वार करून त्याला गंभीररित्या जखमी केले’ असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

या संदर्भात पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

‘हल्ला करणाऱ्या तीन तरुणांपैकी आम्ही चौहान नामक एका तरुणाला अटक केली आहे. त्याचा भाऊ आणि अजून एक साथीदार निकाळजे फरार आहे. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत’ असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!