आवर्तन पवई इम्पॅक्ट: पवई तलाव भागातील डेब्रिज उचलली

आवर्तन पवई आणि पवईकरांच्या परिश्रमाला यश मिळाले असून, पवई तलाव भागात टाकला जाणारी डेब्रिज उचलण्यास सुरुवात झाली आहे. आवर्तन पवई सह पवईकर मुक्ताराम कांबळे, डीपीके उदास यांनी पालिकेला लेखी तक्रार करत याकडे लक्ष वेधले होते. अनेक पवईकरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुद्दा लावून धरला होता. या सर्व प्रयत्नांना यश आले असून, फुटपाथ आणि चालण्यासाठी असणाऱ्या मार्गावरील कचरा पालिकेच्या घनकचरा विभागाने उचलला आहे.

पवईला लाभलेले निसर्ग सौंदर्य असणाऱ्या पवई तलाव पाण्यात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे संकटात सापडला आहे. त्यात भर म्हणून अज्ञान व्यक्तींकडून बांधकाम आणि खोदकामाची डेब्रिज (मलबा) सुद्धा या परिसरात टाकला जात असल्याने पवई तलावाचे भवितव्य धोक्यात आले आहे. या परिस्थितीला घेवून “आवर्तन पवई”ने ३० मे रोजी पवई तलाव भागाचा झाला उकिरडा, परिसरात टाकला जातोय मलबा या मथळ्याखाली बातमी करत पाठपुरावा करत पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते.

या संदर्भात स्थानिक रहिवाशी मुक्ताराम कांबळे, डीपीके उदास आणि आवर्तन पवई यांनी पालिकेकडे लेखी तक्रार करून त्वरित मलबा हटवण्याची मागणी केली होती. याची दखल घेत पालिकेने हयगय करणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यावर खात्या अंतर्गत कारवाई करत, पवई पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करून लवकरच हे डेब्रिज उचलू असे आश्वासन आवर्तन पवईला दिले होते.

५ जूनला जागतिक पर्यावरण दिनी पवई तलाव भागातून जमा करण्यात आलेला कचरा सोबत पालिका अधिकारी

५ जूनला जागतिक पर्यावरण दिनी पवई तलाव भागातून जमा करण्यात आलेला कचरा क्लीन-अप गाडीत भरताना

५ जूनला जागतिक पर्यावरण दिनी यंग एन्वार्यमेंट, आयआयटी मुंबई विद्यार्थ्यांची सामाजिक संस्था – अभ्युदय, निसर्ग स्वास्थ्य संस्था आणि पवई-लेक ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येने मुंबईकरांनी पवई तलाव वाचवण्यासाठी त्याच्या परिसरात मेगा स्वच्छता मोहीम राबवत जवळपास ६ छोट्या क्लीन-अप गाडी भरून कचरा, प्लास्टिक जमा केले होते. यावेळी नागरिकांनी तलाव भागातच असणाऱ्या पालिका कार्यालयात जावून तेथील अधिकाऱ्यांना तलाव भागात पडलेला मलबा त्वरित हटवण्याची मागणी केली.

‘आम्ही तलावाच्या बाहेरच्या भागात असणारा मलबा उचलला आहे. तलावाच्या आत काही कामानिमित्त टाकलेला मलबा हा आम्ही लवकरच उचलू’ असे याबाबत बोलताना पालिका एस विभाग, घनकचरा खात्याच्या अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.

दक्ष पवईकरांच्या जागरूकतेमुळे आणि पाठपुराव्यामुळेच पवई तलावातील हे संकट टळले आहे. मात्र एवढ्यावरच हुरळून न-जाता आपला निसर्ग आणि परिसर वाचवण्यासाठी पवईकरांनी अशाच प्रकारे सतत एकत्रित रित्या काम करणे आवश्यक आहे. असे आवाहन सुद्धा पवई-लेक ऑर्गनायझेशनच्यावतीने यावेळी करण्यात आले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!