हिरानंदानीत महिला डॉक्टरची आत्महत्या

हिरानंदानी पवई येथील नोरिटा इमारतीत राहणाऱ्या ७१ वर्षीय डॉक्टर महिलेने १९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९.२० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृदुला भट्टाचार्य असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून, मानसिक तणावातून तिने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

हिरानंदानीतील नोरिटा इमारतीत सकाळी नियमित गडबड सुरु असताना, सुरक्षा रक्षकाला पार्किंग भागात काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज आला. त्याने तिकडे धावत जावून पाहिले असता एक महिला जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत निपचिप पडली होती. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर राहणाऱ्या परिवारातील ती महिला असल्याचे त्याने ओळखताच परिवाराला याबाबत माहिती दिली.

भट्टाचार्य स्वतः डॉक्टर आहेत. घरातील व्यक्तींच्या आजारपणामुळे गेली अनेक दिवस त्या मानसिक तणावामुळे निराशेत होत्या. त्यांना या तणावातून बाहेर काढण्यासाठी अलाहाबादवरून त्यांच्या मुलाने आपल्यासोबत मुंबईत आणले होते. इथे असताना सुद्धा त्या मानसिक तणावात असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. असे त्यांच्या परिवाराने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

“१९ व्या मजल्यावर त्यांची दोन घरे आहेत. पाठीमागील अनेक दिवस महिलेची चलबिचल जाणवत होती. सकाळी परिवारातील सर्व झोपेत असतानाच वृद्ध महिलेने उडी मारून आत्महत्या केली आहे” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पवई पोलीस आणि डॉक्टर यांनी घटनास्थळी धाव घेतली. डोक्याला जबर मार लागल्याने, रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी प्राथमिक माहितीत सांगितले. पवई पोलिस अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes