निरंजन हिरानंदानींच्या नावे गंडा घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ठगाला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रातिनिधिक छायाचित्र

नामांकित उद्योजक आणि विकासक डॉ निरंजन हिरानंदानी यांचा फोटो आणि नावाचा वापर करत देशभरातील उद्योजकांना गंडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या एका तरुणाला पवई पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. आपण नवीन व्यवसाय सुरु करत आहे त्यात गुंतवणूक करा असा संदेश पाठवून तो तरुण त्यांच्याकडे गुंतवणुकीची मागणी करत होता. मोहमद अरशद असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव असून, तो उच्चशिक्षित आहे. त्याचा एक भाऊ परदेशात डॉक्टर तर दुसरा भाऊ सुरक्षा यंत्रणेत कार्यरत आहे.

अरशद व्हाटसअपवर हिरानंदानी यांचा फोटो आणि नाव वापरत बड्या उद्योजकांना संदेश करत आपण एक नवीन व्यवसाय सुरु करत असून, त्यात गुंतवणूक करण्यास सांगत असे. मुंबईतील अनेक मोठ्या उद्योजकांना असा संदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांनी याबाबत चौकशी केली होती.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासक निरंजन हिरानंदानी यांच्या वकिलानी पोलीस ठाण्यात येवून हिरानंदानी यांचे नाव आणि फोटो वापरत एक अज्ञात इसम ओळख चोरी करून उद्योजकांना व्हाटसअपवर संदेश करत असल्याची तक्रार नोंद केली होती.

बनावट ओळख तयार करून वावरणाऱ्या या तरुणाने अनेक नामांकित उद्योजकांना संदेश पाठवत त्यांचे ईमेल आयडी आणि पर्सनल नंबरची मागणी केली होती. नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासह, सहयोग आणि मार्गदर्शन करण्यासाठी तो त्यांना आमंत्रित करत होता. याला काही लोकांनी प्रतिसाद देत भेटण्याची मागणी केली होती. तेव्हा तो मी परदेशात आहे असे सांगत त्यांना टाळत असे, असेही याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.

काही उद्योजकांना याबाबत शंका आल्याने त्यांनी प्रत्यक्ष हिरानंदानी यांना संपर्क साधून याची माहिती विचारली असता ओळख चोरीचा प्रकार समोर आला.

यासंदर्भात पवई पोलीस गुन्हा दाखल करून तपास करत असताना मोबाईल नंबर आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर आरोपीचे आधारकार्ड पोलिसांच्या हाती लागले. या माहितीच्या आधारावर पवई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यश पालवे आणि पथकाने उत्तरप्रदेश, प्रयागराज जिल्ह्यातील नैनी येथून तेथील पोलिसांच्या मदतीने आरोपी तरुण अरशद याला अटक केली आहे.

आम्ही आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हस्तगत केला असून, त्याला स्थानिक न्यायालयात हजर करून मुंबईत आणले जात आहे. आरोपी उच्चशिक्षित असून, त्याचा एक भाऊ परदेशात डॉक्टर तर एक भाऊ सुरक्षा यंत्रणेत कार्यरत आहे.

प्रत्येक अपडेटसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!