पालिकेच्या सुरक्षा रक्षकावर गर्दुल्यांचा प्राणघातक हल्ला

पवईतील निटी भागात पाईपलाईनला लागून भांडूपकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाण्यास रोखले म्हणून ३ तरुणांनी येथील पालिकेच्या सुरक्षारक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. या संदर्भात पवई पोलीस भादंवि कलम ३५३, ३३४ सह गुन्हा नोंद करून अधिक तपास करीत आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मुंबईच्या अनेक भागातून जात आहेत. पवईतील निटी इन्स्टिट्यूटजवळून सुद्धा भांडूपकडे अशाच पाण्याच्या पाईपलाईन जात आहेत. या परिसरात खाजगी वाहने आणि व्यक्ती जावून धोका निर्माण होऊ नये म्हणून याच्या भांडूप आणि पवई येथील प्रवेशद्वारावर पालिकेतर्फे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हा भाग बोरिवली राष्ट्रीय उद्यानाला लागून असल्यामुळे बिबट्यांचा वावर सुद्धा पाईपलाईन भागात पहावयास मिळतो त्यामुळे रात्रीच्या वेळी या भागात कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

सोमवारी संध्याकाळी या परिसराच्या पवई येथील प्रवेशद्वाराजवळ पालिकेचे सुरक्षारक्षक भगवान रामा शिंतोळे (४२) आपल्या सहकाऱ्यांसोबत कर्तव्य बजावत होते. ‘रात्री नशेत असणारा एक इसम त्यांच्याजवळ येवून त्यांना परिसरात प्रवेश देण्यासाठी जबरदस्ती करत होता मात्र त्यांनी त्याला नकार देत तेथून जाण्यास सांगितले. काही वेळाने तो इसम अजून दोन मित्रांना घेऊन तिथे आला आणि पुन्हा त्या भागात जाण्यासाठी गेट उघडण्यासाठी शिंतोळे यांच्याशी वाद घालू लागला. हा वाद सुरु असतानाच एक तरुण आपल्या जवळील धारदार शस्त्राने त्यांच्या चेहऱ्यावर आणि छातीवर वार करत असताना शिंतोळे यांनी बचावासाठी आरडाओरड करताच तिघांनीही तिथून पळ काढला’, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिंतोळे यांना कर्तव्यावर असणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी गस्त वाहन बोलावून त्वरित मुलूंड येथील एम टी अग्रवाल रुग्णालयात दाखल केले.

‘भादंवि कलम ३५३ (लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे), ३३४ (दुखापत करणे), ३४ (एकाच उद्देशाने एकापेक्षा अधिक व्यक्तींचा गुन्ह्यातील सहभाग) नुसार गुन्हा नोंद करून आम्ही हल्ला करणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेत आहोत’, असे याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले यांनी सांगितले.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!