अखेर चांदिवली फार्म रोडवरील सोफा हटला; सीसीडब्ल्यूएच्या पाठपुराव्याला यश

चांदिवली फार्म रोडवर महिनाभरापासून पडून असलेला भलामोठा सोफा अखेर चांदिवली रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन (सीसीडब्ल्यूए) आणि रहिवाशांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर रस्त्यावरून हटवण्यात आला आहे. नागरिकांचा हा छोटासा विजय असला, तरी समस्या अद्याप संपलेली नाही.

चांदिवली फार्म रोडवरील कार्यालये व रहिवासी संकुलांबरोबरच पवईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचीही मोठी वर्दळ या रस्त्यावर असते. त्यामुळे या मार्गावर दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. याशिवाय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या रस्त्यावरील कमानी ऑईल मिलसमोरील गटाराच्या आवरणावर एक मोठा सोफा टाकण्यात आला होता.

आधीच गजबजलेल्या या रस्त्यावर हा भलामोठा सोफा टाकल्याने वाहतूक कोंडी वाढली होती. स्थानिक नागरिकांसह चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशनने याबाबत ११ जानेवारी रोजी पहिले ट्विट करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

यावर उत्तर देताना बीएमसी म्हणाली, सर तुमच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. जलद निराकरणासाठी आम्ही संबंधित विभागाला सूचित केले आहे.

जवळपास १० दिवसांनंतरही कोणताही बदल न झाल्याने, २१ जानेवारी रोजी असोसिएशनने पुन्हा ट्विट करून बीएमसीने यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यात भर म्हणजे या ठिकाणी पथदिवेही काम करत नसल्याने अनेक वाहनचालकांना अंधारात सोफा रस्त्यावर असल्याचे लक्षात न आल्याने अपघाताची शक्यता बळावली होती.

याबाबत महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर आवर्तन पवईला सांगितले की, या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने नाल्यावरील लोखंडी झाकण आणि परिसर खराब झाला आहे. आम्ही लवकरच त्याची दुरुस्ती करत आहोत आणि सोफा काढला जाईल.

नागरिक आणि सीसीडब्ल्यूए यांच्या या सततच्या पाठपुराव्याला रविवारी यश आले असून, रस्त्यावर पडलेला हा सोफा अखेर हटवण्यात आला आहे. पण अजून ही समस्या संपलेली नाही, सोफ्याची जागा आता बॅरिकेड्सनी घेतली आहे. त्यामुळे आता हे बॅरिकेड्स हटवण्यासाठी नागरिकांचा संघर्ष होणार आहे.

One Response to अखेर चांदिवली फार्म रोडवरील सोफा हटला; सीसीडब्ल्यूएच्या पाठपुराव्याला यश

  1. [email protected] February 6, 2023 at 8:52 am #

    नाही अजून पूर्ण पणे काम झालेले नाही. कित्येक दिवस येथे पाणी वाहते आहे. थोडेफार काम केले परंतु पाण्याच्या गळतीमुळे समस्या तशीच आहे….. कायम स्वरूपी ऊपाय योजना व्हावी. 🙏

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!