चांदिवलीत लवकरच बनणार विस्तारित अग्निशमन केंद्र

@अविनाश हजारे, @सुषमा चव्हाण

आमदार आरिफ नसिम खान, पालिका व अग्निशमन अधिकाऱ्यांसोबत जागेची पहाणी करताना

चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार या परिसराचा होणारा विस्तार आणि घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना रोखण्यासाठी लवकरच चांदिवली येथे मरोळ अग्निशमन केंद्राचे विस्तारीत अग्निशमन केंद्र उभे करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात आमदार नसीम खान यांच्यासह मुंबई अग्निशमन केंद्राचे वरिष्ठ अधिकारी एस. के. बांगर, एच. आर. शेट्टी तसेच महानगरपालिका ‘एल’ ईमारत विभागाचे श्री. पगारे व परिरक्षण विभागाचे श्री. राठोड यांनी चांदिवली येथील जागेची पाहणी केली.

चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार परिसरात गेल्या काही वर्षात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणत वाढल्या असतानाच यासाठी अग्निशमन दल मरोळ किंवा विक्रोळी भागातून पाचारण करण्यात येते. लेकहोमच्या घटनेमुळे तर संपूर्ण मुंबईला हादरवून सोडले. अग्निशमन यंत्रणेला पोहचायला लागलेला वेळ आणि सुविधांच्या कमतरतेमुळे अनेक निष्पाप लोकांना या आगीत प्राण गमवावे लागले होते.

लेकहोमच्या घटनेनंतर चांदिवली आणि पवई परिसरात आगीच्या घटनांची जशी लडीच लागली होती. त्यातच परिसरांपासून अग्निशमन केंद्र खूपच लांब असल्याने घटना घडल्यानंतर अग्निशमन यंत्रणेची  तत्काळ मदत पोहोचू शकत नाही. प्रत्येक वेळेस मरोळ आणि विक्रोळी वरून येणाऱ्या अग्निशमन दलांच्या गाड्यांमुळे जिव टांगणीला लागून राहणाऱ्या स्थानिकांनी परिसरातच अग्निशमन केंद्र उभे करावे अशी मागणी जोर लावून धरली होती.

“पवई आणि चांदिवली परिसरात दिड लाखाहून अधिक कुटुंबे राहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून येथे आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आमच्या येथे लेकहोममध्ये घडलेल्या अग्निकांडात तर विनाकारण लोकांना जीव गमवावा लागला होता. उंचच्या उंच इमारतीचे माहेरघर असणाऱ्या आपल्या या परिसरात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुसज्ज असे अग्निशमन केंद्र उभे करावे अशी मागणी आम्ही तेव्हापासून स्थानिक आमदार आणि सरकार दरबारी करत होतो. अखेर आमदार नसीम खान यांनी त्याचा पाठपुरावा करत आमच्याच कॉम्प्लेक्ससमोर पालिकेची एक मोकळी जागा हेरून तिथे हे केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले असून लवकरच ते काम पूर्ण केले जैन असे सांगण्यात येत आहे.” असे याबाबत बोलताना लेकहोम फेडरेशनचे सचिव आणि फेज ३ चे अध्यक्ष मजहर ठाकूर यांनी सांगितले.

“आज पालिका आणि अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्यासोबत येथे उपलब्ध जागेची पाहणी केली आहे. या परिसरासाठी अत्यावश्यक असणारे हे अग्निशमन केंद्र सर्व गोष्टींची पूर्तता करत पुढील ४५ दिवसाच्या आत उभे केले जाईल,” स्थानिक आमदार नसिम खान यांनी यावेळी बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!