अलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पवईत महिलेविरूद्ध गुन्हा दाखल

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी असणाऱ्या अलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पवईतील लेकहोम येथे राहणाऱ्या एका महिले विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी पालिका असिस्टंट मेडिकल ऑफिसर डॉ हिरामण महांगडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने माळा सिल करून प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून, वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर जाण्यास मनाई असतानाही महिला बाहेर पडली होती.

कोरोना विषाणूंच्या विळख्यातून सुटका होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असतानाच मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह मिळण्याचा वेग पुन्हा वाढला आहे. वाढत जाणऱ्या बाधितांच्या संख्येला रोखण्यासाठी पालिकेने आता पुन्हा अति कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

१४ फेब्रुवारीला लेकहोम येथील एव्हरेस्ट हाईट इमारतीत राहणाऱ्या ४८ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता. पालिका आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेत इमारतीच्या संबंधित माळ्याला सील केले होते. नागरिकांना अलगीकरणाच्या योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई केली होती. तसेच तशा आशयाचे पोस्टर सुद्धा माळ्यावर लावण्यात आले होते.

नियमांचे उल्लंघन

१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजताचे सुमारास मी लेकहोम, एव्हरेस्ट हाईटस १७ वा माळा येथे तपासणीसाठी गेलो असताना त्या माळ्यावर राहणारी महिला घरात मिळून आली नाही. याबाबत मी सोसायटी कार्यालयात चौकशी केली असता सदर महिला मुंबईच्या बाहेर कामानिमित्त गेली असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर १८ फेब्रुवारीला संध्याकाळी ३ वाजता तिथे जावून महिलेबाबत चौकशी केली असता ती परतली नसल्याची माहिती मिळाली. याबाबत मेडिकल ऑफिसर एल वॉर्ड जितेंद्र जाधव यांना माहिती दिली असता त्यांनी मला पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची सूचना दिल्याने मी तक्रार देण्यास आलो आहे, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात तक्रारदार महांगडे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पवई पोलिसांनी सांगितले की, “महिलेने नियमांचे पालन न करता मुंबईच्या बाहेर कामानिमित्त जाऊन बृहन्मुंबई महानगरपालिका, राज्य व केंद्र सरकारने वेळोवेळी जनतेला सूचित केले असतानाही संसर्ग पसरण्याची तिस माहिती असताना सुद्धा आदेशांची अवज्ञा केली म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब अन्वये, कोरोना कोविड १९ कलम ११ अन्वये व भादवि कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!