केस प्रत्यारोपण: डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच मृत्यू; जेजे रुग्णालयाच्या पॅनेलचा अहवाल

केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रक्रियेनंतर चांदिवली येथील ४३ वर्षीय व्यावसायिक श्रवण कुमार चौधरी यांचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी याबाबत चौकशीची मागणी केल्याच्या नऊ महिन्यांनतर अनेक पातळीवर निष्काळजीपणा आढळून आल्याचे राज्यस्तरीय जे जे रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणात नुकताच एफआयआर दाखल करण्यात आला असून, डॉक्टरला अध्याप अटक करण्यात आलेली नाही.

सहाय्यक पोलिस आयुक्त (साकीनाका विभाग) मिलिंद खेलते यांनी या प्रकरणी समितीचा अहवाल मिळाल्याची पुष्टी केली.

“या अहवालात क्लिनिकच्या प्रक्रियेत दुर्लक्ष झाल्याची अनेक उदाहरणे दिली आहेत. आम्ही या अहवालासंदर्भात कायदेशीर मार्गाने कशा आधारे कारवाई करू शकतो याबाबत माहिती मिळवत आहोत,” असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर सावंत यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण

चांदिवलीतील नहार येथे राहणारे लॉजिस्टीक व्यवसायाचे मालक चौधरी यांचेवर चिंचपोकळी येथील एका खाजगी क्लिनिकमध्ये त्वचारोग तज्ज्ञ डॉ विकास हलवाई यांच्याकडे केसांचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. प्रत्यारोणाच्या ५० तासांनी म्हणजे ९ मार्च २०१९ रोजी त्यांचे श्वसनाचा त्रास जाणवून रुग्णालयात निधन झाले.

साकीनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांच्यावर ३५०० केसांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया १५ तास चिंचपोकळी येथील रुग्णालयात शुक्रवार, ७ मार्च रोजी करण्यात आली होती. ज्यासाठी ५ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी घरी असताना त्यांना दम्याचा त्रास जाणवू लागला होता. त्यांच्या चेहऱ्यावर सूज आल्याने कुटुंबियांनी त्यांना पवईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे व्हिसेरा आणि अवयव विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असताना, पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात अनाफिलेक्सिसची लक्षणे, तीव्र ऍलर्जी आणि अनेक-अवयव निकामी झाल्याचे आढळून आले होते.

घटनेनंतर साकीनाका पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करत गुन्हे प्रक्रिया कायद्याच्या कलम १७४ अंतर्गत (एखाद्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्यास पोलिसांना चौकशी करण्याचा राज्य सरकारकडून मिळालेला अधिकार) याची चौकशी सुरू केली होती.

या प्रकरणात वैद्यकीय दुर्लक्ष आहे का जाणून घेण्यासाठी जेजे रुग्णालयातील प्लास्टिक सर्जनसह चार डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली होती. जेजे हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सपले यांनी सांगितले की, “हा अहवाल पोलिसांना पाठविण्यात आला आहे.”

डिसेंबर महिन्यात परिवाराने मुंबई पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चौधरी यांची पत्नी सीमा आणि पुतण्या सुरेश यांनी चौधरी यांच्या मृत्यूला नऊ महिने उलटले आहेत, या प्रकरणात पोलिसांनी लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. गुन्हा नोंद व्हायला दहा महिने उलटले. आता प्रत्यक्ष निकाल यायला किती काळ वाट पहावी लागेल? असा प्रश्न श्रवण कुमार यांचे भाऊ शिवकुमार यांनी उपस्थित केला आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!