चांदिवलीत बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग, मजूरांची सुखरुप सुटका

@प्रमोद चव्हाण, रमेश कांबळे

चांदिवली येथील हिरानंदानी विकासकाच्या इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याची घटना आज दुपारी १२.१५ वाजता घडली आहे. अग्निशमन दलाच्या २० – २५ गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीतून ७० – ८० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, धूर शरीरात गेल्याने श्वसनास त्रास जाणवू लागलेल्या ६ कामगारांना राजावाडी येथे उपचारासाठी नेण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

इमारतीच्या तळमजल्यावर वायरिंग आणि इतर काम चालू असताना ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, वायर आणि इतर ज्वलनशील पदार्थामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली आहे.

पवई, साकीनाका भागात गेल्या काही महिन्यात आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चांदिवली येथील साकीविहार रोडवर असणाऱ्या नेट मॅजिक कंपनीच्या तळमजल्याला आग लागल्याची माहिती १२.१६ वाजता दूरध्वनीवरून मिळाली असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे.

तळमजला अधिक सहा मजली इमारत असलेल्या इमारतीमधून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. संपूर्ण परिसरात धुरामुळे धुक्यासारखे वातावरण तयार झाले आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या दलाच्या गाड्या, पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका मिळून २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.

“ऑक्सिजन मास्कच्या साहय्याने अग्निशमन दलाचे जवान तळमजल्यावर जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र आतमध्ये मोठ्या प्रमाणात धूर कोंडला गेला आहे त्यामुळे आत घुसण्यास अडचणी येत आहेत. धूर बाहेर फेकण्यासाठी एक्झोस्ट यंत्रणा आत लावण्यात आली आहे. धुराचा दबाव कमी होताच आत प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवणे सोपे होईल” असे यावेळी बोलताना घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पवई पोलिसांकडून देण्यात येत आहे.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!