पवईच्या एनटीपीसी म्हाडा कॉलनीत रहिवाशी इमारतीत आग

पवईतील एनटीपीसी म्हाडा कॉलनीमध्ये रहिवाशी इमारतीला आज, ३० नोव्हेंबर संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या ३ ते १४ माळ्यावरील बाहेरील भागात ही आग पसरलेली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईच्या हिरापन्ना मॉलसमोर असणाऱ्या एनटीपीसी म्हाडा कॉलनीमधील पंचरत्न इमारत, ई विंगमध्ये ११व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पवई पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली.

“इमारतीच्या ११व्या मजल्यावरील ११०४ फ्लॅटमध्ये असणाऱ्या एसीमध्ये शॉर्टसर्किट निर्माण झाल्याने ही आग लागली होती. छतांवर असणाऱ्या प्लास्टिकच्या भागाला आग पकडल्याने त्याचा भाग वितळून खाली पडून ३ऱ्या मजल्यापासून १४व्या मजल्यापर्यंत ही आग पसरली होती.” असे याबाबत बोलताना अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

“संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आग लागताच इमारतीच्या रहिवाशांना ताबडतोब बाहेर काढत इमारत रिकामी करण्यात आली. विक्रोळी आणि मरोळ अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. या आगीत कोणीही जखमी झाले नसून, जीवितहानी झाल्याची नोंद नाही,” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आमचा पंचनामा सुरु आहे मोठी हानी झालेली नाही. बाहेरील भागातील वस्तू आणि भाग जळाल्याचे समोर येत आहे.”

https://www.facebook.com/alinasalonpowaii

“आगीचे स्वरूप हे खूपच मोठे होते. इमारतीच्या बाहेरील संपूर्ण भागातून ही आग लागली होती. सुदैवाने कोणत्याही फ्लॅटच्या आतील भागात या आगीचा प्रसार झाला नाही. नाहीतर उग्र रूप धारण करून मोठी दुर्घटना घडू शकली असती,” असेही याबाबत बोलताना अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

आग लागल्याचे व्हिडीओ आणि फोटो काही वेळातच सोशल मीडियातून व्हायरल झाल्याने आगीची भीषणता पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळताच पवईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!