हिरानंदानीत फेब्रीकेशन युनिटला आग

हिरानंदानीमधील जयभीमनगर परिसरात असणाऱ्या फेब्रीकेशन युनिटला रविवारी रात्री १०.२० वाजता आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या ३ बंबांच्या मदतीने १५ मिनिटाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले गेले असून, आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानीची नोंद नाही.

सध्या मुंबईत आगीचे सत्रच सुरु आहे. या आगींमध्ये अनेक मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पवईमध्ये सुद्धा वारंवार आगीच्या घटना घडत असून, हिरानंदानीतील जयभीमनगर बौद्ध विहाराजवळ असणाऱ्या एका फेब्रीकेशन युनिटमध्ये आज (रविवारी) आग लागल्याची घटना घडली.

‘युनिट संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालू असते, त्यानंतर कामगार घरी निघून गेले होते. रात्री ९.२० च्या सुमारास येथून जाणाऱ्या काही लोकांना युनिटच्या आतून धूर निघत असल्याचे आढळून आले; काही मिनिटातच संपूर्ण युनिट आगीच्या भक्षस्थानी आले’ असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई अग्निशमन दलाचे २ फायर इंजिन आणि १ बंबाच्या साहय्याने १५ मिनिटाच्या मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

‘आगीचे नक्की कारण अजून स्पष्ट झाले नाही. फेब्रीकेशन युनिटपासून काहीच अंतरावर केमिकल साठा केलेले गोडाऊन आहे, मात्र आग तिथपर्यंत पोहचली नसल्याने मोठी हानी टळली’ असल्याचे यावेळी बोलताना एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले.

रात्रीच्या वेळेस आग लागलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या परिसरात अनेक नशेखोरांचा वावर असतो. नशेत एखादी जिवंत आगीची ठिणगी त्यांनी तिथे टाकली असावी आणि सुक्या गवताच्या सहाय्याने युनिट पर्यंत आग पसरली असावी असा अंदाज येथील काही नागरिकांनी यावेळी वर्तवला आहे.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!