पवई हिरानंदानी मधील हायको सुपरमार्केट इमारतीमध्ये भीषण आग

गुरुवार, ७ जुलैला पहाटे मुंबईत पावसाचे धुमशान सुरू असतानाच पवईतील हिरानंदानी संकुलमधील हायको सुपरमार्केटच्या इमारती मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी सुपरमार्केट बंद असल्यामुळे आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही.

तळमजला अधिक पाच मजली इमारत असणाऱ्या हायको सुपारमार्केट इमारती मधील पहाटे ६.३० वाजताच्या सुमारास पाचव्या मजल्यावरून अचानकपणे धूर येत असल्याचे येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. काही वेळातच आग भडकली आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. याबाबत मुंबई अग्निशमन दलाला माहिती देताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम सुरू केले. पाठोपाठ मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडत नागरिकांनी परिसरात गर्दी केली.

मरोळ, विक्रोळी, मुलुंड अग्निशमन विभागासह भायखळा विभागाच्या ८ फायर इंजिन, ५ जंबो वॉटर टँकर, फायर ट्रक्स, रुग्णवाहिका, पालिका एस विभागाचे कर्मचारी आणि पवई पोलीस असा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. अग्निशमन दलाने सदर आग ‘स्तर -२’ची असल्याचे जाहीर करत काही वेळातच अधिक कुमक घटनास्थळी दाखल झाली होती.
मेलुहा हॉटेलमधून पाण्याचा मारा

आग प्रत्येक क्षणाक्षणाला पसरत असल्याने इमारतीला लागुनच असणाऱ्या मेलुहा हॉटेलमधील अग्निशमन यंत्रणेचा वापर करत छतावरून पाण्याचा मारा करण्यात येत होता. अथक परिश्रमानंतर जवळपास ११.१५च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

सुपरमार्केटला आग लागल्याची माहिती मिळताच मॉर्निंग वॉकरसह बघ्यांची मोठी गर्दी या परिसरात झाली होती. अग्निशमन दलाचा मोठा ताफा या परिसरात असल्याने ऐन कार्यालयीन वेळात या मार्गावरील वाहतूक बंद करून दुसरीकडून वळवण्यात आली होती. त्यातच याच मार्गावर एक पाण्याचा डंपर बंद पडल्याने हिरानंदानी परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

आग कशी लागली याबाबतचे नक्की कारण समजू शकलेले नसून, आमचा तपास सुरु असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!