लेकहोममध्ये पुन्हा आग, ३ गंभीर जखमी

छायाचित्र: रविराज शिंदे

चांदिवली येथील लेकहोम कॉम्प्लेक्समधील लेक फ्लोरेन्स इमारतीच्या ‘बी’ विंगमधील १३व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना आज (मंगळवार) संध्याकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या साहय्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीची माहिती मिळाल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाल्याने घसरून पडून आणि धूर शरीरात गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ११ जणांना हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुष्पलता शामलाल डोडेजा (७९), दीपिका पिनाकी (५५) सतीश नायर (७०) हे या घटनेत गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आज, मंगळवारी संध्याकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास चांदिवली लेकहोम येथील फेज १ मध्ये असणाऱ्या लेक फ्लोरेन्स इमारतीच्या १३व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १३०३, १३०४ मधून धूर निघत असल्याचे काही रहिवाशांच्या निदर्शनातस आले. त्यांनी सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून सर्व रहिवाशांना याची माहिती देत इमारत रिकामी करण्यास सांगितले.

‘आगीची माहिती मिळताच संपूर्ण इमारतीत रहिवाशांची एकच धावपळ उडाली. या धावपळीतच इमारतीत राहणाऱ्या एक जेष्ठ नागरिक घसरून पडून गंभीर रित्या जखमी झाल्या आहेत. तर काही रहिवाशी, जेष्ठ नागरिकांच्या शरीरात धूर गेल्याने गुदमरत त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता’ असे याबाबत बोलताना काही रहिवाशांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या प्रयत्नातून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. घरात सुरु असणारा टीव्हीमध्ये स्फोट झाल्यामुळे घरात आग लागली असल्याची माहिती समोर येत असल्याचे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

‘अग्निशमन दलाला वेळीच माहिती देऊनही घटनास्थळी त्यांना पोहचायला जवळपास अर्धा तास लागला, तोपर्यंत संपूर्ण फ्लॅट आगीच्या कवेत आला होता. विशेष म्हणजे कॉम्प्लेक्सच्या समोरच चांदिवलीकडील गेटसमोर मिनी अग्निशमन केंद्र आहे, त्यानंतरही अग्निशमन दल जर अर्ध्या तासानंतर पोहचत असेल तर त्याचा उपयोग काय?’ असेही याबाबत बोलताना रहिवाशांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘ही घटना दिवसा घडली होती. दिवसाच्या काळात घरामध्ये शक्यतो जेष्ठ नागरिक, महिला आणि मुलेच असतात. पुरुष मंडळी दिवसा कामावर असतात. अशावेळी सुरक्षा यंत्रणांना घटनास्थळी पोहचायला लागणार वेळ ही धोक्याची घंटा आहे. लेकहोममध्ये वारंवार अशाप्रकारच्या आगीच्या घटना घडत आहेत. काही वर्षांपूर्वी घडलेल्या अशाच एका आगीच्या घटनेत सात लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आत्तापर्यंत जवळपास ४ वेळा आगीच्या घटना या कॉम्प्लेक्समध्ये घडल्या आहेत. विकासकाने आम्हाला दिलेल्या सुरक्षा सुविधा ह्या कमकुवत आहेत. प्रशासन वेळच्या वेळी अग्निसुरक्षेची पडताळणी करत नसल्यामुळेच अशा घटना वारंवार घडत आहेत.’

‘पवई, चांदिवली परिसर हा उंच इमारतींचा भाग म्हणून ओळखला जातो. मरोळ किंवा विक्रोळी अग्निशमन केंद्रातून येथे अग्निशमन यंत्रणा पोहचायला उशीर होतो. यामुळे या भागासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र बनवण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून सतत होत आहे. मात्र, त्यानंतरही प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधी याकडे कानाडोळा करत असून, स्थानिकांचा जीव टांगणीला लावून ठेवला आहे. स्थानिक आमदार यांच्या प्रयत्नातून चांदिवली येथे मिनी अग्निशमन केंद्र बनवण्यात आले आहे, मात्र ते उपयोगी ठरत नाही. वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटना आणि या परिसरात असणाऱ्या उंच इमारतींचा विचार करता सक्षम आणि सोयीसुविधांनी परिपूर्ण असे स्वतंत्र अग्निशमन केंद्र ह्या परिसरात हवे’ असे याबाबत बोलताना रहिवाशांनी सांगितले.

अमित सिंग, अभिषेक नायर, सतीश नायर, सुजाता नायर, प्रियांका अभिलानी, पुष्पा डोडेजा, दीपिका बसू, दीपक जया, स्मरीका, शिखा राजा, मशूमी काले अशी हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रहिवाशांची नावे आहेत.

आगीच्या घटनेमुळे घाबरलेल्या नागरिकांच्यात गडबड गोंधळ उडाल्यामुळे आणि शरीरात धूर गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे जवळपास ११ लोकांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुष्पलता शामलाल डोडेजा (७९), दीपिका पिनाकी (५५) सतीश नायर (७०) ह्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु असून, इतर लोकांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे, असे याबाबत बोलताना हिरानंदानी रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!