धावत्या ट्रकला आग; पवई पोलिसांच्या सजगतेमुळे टळली मोठी दुर्घटना

जळता ट्रकसर्व फोटो रमेश कांबळे

आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास आदी शंकराचार्य मार्गावर धावणाऱ्या एका ट्रकला आग लागल्याची घटना पवई परिसरात घडली. पवई पोलिसांच्या आयआयटी बिट चौकीत असणाऱ्या पोलिसांनी स्थानिक दुकानदारांसह धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओ डी सी ट्रान्सपोर्ट कंपनीचा एमएच १० एडब्ल्यू ७३२७ ट्रक जोगेश्वरी येथून लाकडी खुर्च्या, टेबल, कॉम्पुटर, एअर कंडिशनर आणि बॅटरीज घेऊन जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड मार्गे ऐरोलीकडे जात होता. रस्त्यावरील पवई प्लाझा भागात आल्यावर त्याचा चालक बाबुराव तानाजी जामदार यांना गाडीतून धूर निघत असल्याचे लक्षात आले.

‘वाहतूक कोंडी निर्माण होण्याचा धोका पाहता सर्विस रोडवर गाडी घेत त्यांनी आयआयटी मेन गेट जवळ गाडी थांबवली पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. गाडीतील धुराने उग्र आगीचे रूप घेतले होते” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

रस्त्यावर जाळणारी गाडी पाहताच पवई पोलिसांच्या आयआयटी बिट चौकी येथील पोलीस शिपाई गणेश कट्टे आणि सागर येडगे यांनी वाहतूक पोलीस आणि स्थानिक दुकानदारांच्या मदतीने आग विझवण्यासाठी धाव घेत रस्त्यावरून जाणाऱ्या सिमेंट मिक्सचरला थांबवत त्यामध्ये असणारे पाणी पाईपच्या साहय्याने मारून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दल पोहचेपर्यंत आग आटोक्यात आली होती.

कट्टे आणि त्यांच्या सहकार्यानी मिळून केलेल्या कार्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, युथ पॉवरच्यावतीने त्यांच्या या शौर्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान सुद्धा केला.

आगीचे नक्की कारण समजले नसून, ट्रकमध्ये असणाऱ्या बॅटरीजचा स्फोट झाल्याने कदाचित आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

जेव्हीएलआरवरच घटना घडल्याने विक्रोळीच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला काही काळ थांबवण्यात आले होते, नंतर त्यांना एका मार्गावरून सोडण्यात आल्याने काही काळासाठी दुपारी सुद्धा वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

ट्रकमधील जळालेले सामान

युथ पॉवर तर्फे साहसी पोलीस शिपायांचा सत्कार करताना पदाधिकारी

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes