फूड डिलिवरी बॉयला चोरीच्या गुन्ह्यात अटक

हिरानंदानी, सुप्रीम बिजनेस पार्कमधून एका व्यक्तीच्या लॅपटॉप बॅगसह, ५० हजाराची रोकड पळवून नेणाऱ्या फूड डिलिवरी बॉयला पवई पोलिसांनी पार्कसाईट येथून बेड्या ठोकल्या आहेत. नावेद तारिक शेख (२२) असे अटक करण्यात आलेल्या फूड डिलिवरी बॉयचे नाव आहे. मित्राच्या आयडीवर हा तरुण डिलिवरी करण्यासाठी आला होता. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत केली आहे.

राघवेंद्र दुबे हे २० जानेवारीला पवई, हिरानंदानी येथील सुप्रीम बिजनेस पार्क येथे काही कामानिमित्त आले होते. काम संपवून संध्याकाळी ८ वाजता ते इमारतीच्या पार्किंगमध्ये आले असताना त्यांना एक फोन आल्याने त्यांनी आपली लॅपटॉप बॅग मोटारसायकलवर पुढे ठेवली होती. फोनवरील बोलणे संपल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांची बॅग गाडीवर नसून, कोणीतरी चोरी केली आहे. याबाबत त्यांनी त्वरित पवई पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीची तक्रार दाखल केली.

“आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता एक तरुण सदर लॅपटॉप बॅग घेवून जाताना आम्हाला दिसून आला,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.

मिळालेल्या फुटेजच्या आधारावर पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे कार्यरत करत तपास सुरु केला होता. घटना घडलेल्या वेळेत त्या परिसरात आलेल्या सर्व लोकांची माहिती पोलिसांनी सुरक्षारक्षकांकडून मिळवत त्या अनुषंगाने सुद्धा तपास सुरु केला होता. “काही डिलिव्हरी बॉय संशयाच्या घेऱ्यात असल्याने त्यांची माहिती मिळवत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर नावेद शेख याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली,” असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.

नावेद याचा मित्र अतिफ शेख मुंबईतील एका नामंकित फूड डिलिवरी कंपनीसाठी फूड डिलिवरी बॉय म्हणून काम करतो. घटनेच्या दिवशी त्याला काहीतरी अतिमहत्वाचे काम असल्याने त्याने आपला मित्र नावेद याला आपल्या आयडीवर लॉगइन करून हिरानंदानी येथून पार्सल घेवून डिलिवरी करण्यास सांगितले. सुप्रीम बिसनेस पार्क येथील एका रेस्टॉरंटमधून पार्सल घेण्यासाठी आलेल्या नावेदला पार्किंगमध्ये एक्तीवा गाडीवर लॅपटॉप बॅग ठेवलेली असून, आसपास कोणीच नसल्याचे पाहून त्याने बॅग घेवून तिथून पळ काढला,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “दुसऱ्याच्या लॉगइनवर कमिशनसाठी काम करणारी तरुणांची मोठी संख्या सध्या कार्यरत आहे. अनेक फूड डिलिव्हरी कंपनीचे लॉगइन मिळवून एकच व्यक्ती अनेक मुलांना ही कामे देत असते. या मुलांचे कोणतेही व्हेरिफिकेशन केले गेलेले नसते, त्यामुळे फूड डिलिव्हरी कंपनीनी याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.”

भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद करून, “नावेद याला न्यायालयात हजर केले असता, पुढील चौकशीसाठी ३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत केली आहे,” पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप धामुणसे यांनी सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांच्यासह पोलीस हवालदार मोहोळ, पोलीस नाईक जगताप, पोलीस नाईक गलांडे, पोलीस शिपाई देशमुख, पोलीस शिपाई कदम आणि पोलीस शिपाई कट्टे यांनी ही कारवाई केली.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!