आमच्यासाठी प्रत्येक दिवस असतो ‘महिला दिन’; जागतिक महिला दिनी पवई पोलिसांकडून ‘ती’चा सन्मान

८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून देशभर साजरा केला जातो, याच महिला दिनाचे औचित्य साधत पवई पोलिसांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला. कोरोना काळात आपआपल्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांना परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. चांदिवली येथील मेगारुगास हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश नांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे, पोलीस निरीक्षक सावंत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

स्त्रियांच्या प्रगतीवरून त्या समाजाची प्रगती मोजता येते असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत बाबासाहेबांनी पाहिलेल्या या प्रगत समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वच समाजातील महिला आघाडीवर आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहेत. अशाच काही स्त्रियांच्या कर्तुत्वाचा आणि प्रतिनिधित्वाचा सन्मान पवई पोलिसांतर्फे जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधत करण्यात आला.

यावेळी अनिता सावंत (मुख्य प्रबंधक हिरानंदानी रुग्णालय), डॉ. प्रतिमा सिंग (प्रिन्सिपल – चंद्रभान कॉलेज), अकांक्षी मुळेकर (मुख्याध्यापिका – मिलिंद विद्यालय), सिमा सबलोक (मुख्याध्यापिका – एस एम शेट्टी स्कूल), कल्याणी पटनाईक (मुख्याध्यापिका – हिरानंदानी फाउंडेशन स्कूल), बिना तामसे – काकडे (प्रोफेसर आयआयटी मुंबई), पूनम पडवळ (अभियंता – महानगरपालिका ‘एस’ विभाग), कोमल नारायणकर ((अभियंता – महानगरपालिका ‘एस’ विभाग), गौरी नायर (मुख्य प्रबंधक – एचडीएफसी बँक), सुषमा चव्हाण (संपादिका – आवर्तन पवई), सुभद्रा पोमेंडकर (समाजसेविका), अनिता सिंग (समाजसेविका), सुषमा आंब्रे (समाजसेविका), माधुरी सिंग (समाजसेविका), पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, पोलीस उपनिरीक्षक सोनाली कोकाटे, म.पो.शि. वनिता किर्तने आणि पूजा पांगे (व्यवस्थापक मेगारुगास हॉल) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

“आज स्त्रिया पुरुषांच्या केवळ बरोबरीने नाहीत, तर पुरुषांच्या दोन-चार पाऊले पुढेच आहेत” असे यावेळी महिलांच्या सन्मानार्थ बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे म्हणाले.

“महिला घर-संसार, समाज, अर्थव्यवस्थासह अनेक ठिकाणी आपल्या सर्वशक्तीनिशी मोलाची भूमिका बजावत असतात. सोबतच ‘ती’ आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी नेहमीच धडपडत असते. अशा ‘ती’ला कोणकोणत्या अडचणी येतात, त्यांचा ‘ती’ सामना कशा प्रकारे करते, ‘ती’ काय करते हे समाजापुढे आणण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि त्यांना सन्मानित करून आम्ही त्यांच्या धाडस आणि कर्तुत्वाचा सन्मान करून इतर महिलांनासुद्धा प्रोत्साहित करतो.” असे यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त परिमंडळ १० महेश्वर रेड्डी म्हणाले.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!