काँग्रेसचे नेते माजी मंत्री नसीम खान यांचा नांदेडमध्ये अपघात, पायाला दुखापत

महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री आरिफ नसीम खान (MLA Naseem Khan) यांच्या गाडीला नांदेडमध्ये अपघात झाला असून, अपघातात नसीम खान यांच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. ते सुखरूप असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.

७ तारखेला राज्यात पोहोचत असलेल्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo) सहभागी होण्यासाठी खान हे हैद्राबादहून नांदेडला येत होते.

नांदेडमधील भिलोली टोल प्लाझा येथे एका कारची नसीम खान प्रवास करत असलेल्या कारला धडक बसली. हा अपघात इतका जोरदार होता की खान प्रवास करत असलेल्या गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. या घटनेत खान यांच्यासह गाडीचा चालक देखील जखमी झाला आहे. घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत खान आणि इतरांना प्रथमोपचार मिळवून देण्यास मदत केली.

नसीम खान हे नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेचे प्रभारी असून, नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेचे संपूर्ण व्यवस्थापन ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत करत आहेत.

अपघातानंतर माध्यमांशी बोलताना नसीम खान यांनी म्हटलं आहे की, “माझ्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून, मी सुखरूप आहे. भारत जोडो यात्रेचे प्रभारी म्हणून माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी मी उत्सुक आहे. आम्ही नांदेडला पोहोचलो आहोत. मला खूप आनंद वाटतो की नांदेड जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत ऊर्जेने आणि प्रेमाने स्वागत होईल.”

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!