पवई क्रेन अपघात: अजून एक कामगाराचा मृत्यू, क्रेन चालकाला अटक

पवईमध्ये क्रेनचा भाग कोसळून घडलेल्या अपघातात मृतांची संख्या चार झाली आहे. रामनाथ सिंग (३८) याचा केईएम रुग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. निष्काळजीपणा बाळगल्याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून क्रेनचालक मोहमद ताहेर (२४) याला अटक केली आहे.

१ जानेवारीला पवईतील आयआयटी येथे आदिशंकराचार्य मार्गवर मलनिसारण वाहिनीचे काम सुरु असताना क्रेनचा भाग कोसळून तिथे काम करणाऱ्या ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची आणि २ कामगार जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

रामेश्वर समय (४०), सत्यनारायण सिंग (४०), विश्वनाथ सिंग (४५) यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. रामनाथ सिंग (३८) आणि परेशनाथ सिंग (४२) यांना गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना केईएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

“रामनाथ याला ९ मिटर खोल खड्यात पडल्याने खूप मोठ्या प्रमाणात अंतर्गत जखमां झाल्या असल्यामुळे उपचार सुरु असतानाच त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. परेशनाथ सिंघ याचे अपघातात दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असल्याने त्यांच्यावर केईएम रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाणार आहे.” असे यावेळी बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

प्रथम अपघाती मृत्यूची नोंद केलेल्या पवई पोलिसांनी पुढे भादवि कलम ३०४ (अ) नुसार गुन्हा नोंद करून, घटनास्थळावरून पळून गेलेला क्रेन चालक मोहमद ताहीर याला निष्काळजीपणा बाळगल्याबद्दल अटक केली आहे.

अपघातानंतर कंत्राटदार आणि सुपरवायझर दोघेही पळून गेल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांची ओळख पटली नसून, बॉडीज अजूनही रुग्णालयात शवाग्रहात ठेवण्यात आलेल्या आहेत.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!