कोविड-१९ लढाईत सहकार्य करणाऱ्या पवईतील ४ सोसायट्यांचा पालिकेच्यावतीने सन्मान

अटलांटिस इमारतीत पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र सुपूर्द करताना पालिका अधिकारीसर्व फोटो मुकेश त्रिवेदी

देशासह राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच या कोरोनाला रोखण्याच्या लढाईत कोरोना योद्ध्यांना आणि यंत्रणांना सहकार्य करणाऱ्या पवईतील ४ सोसायट्यांचा पालिका एस विभागाच्यावतीने सन्मान करण्यात आला. गुरुवार, २३ जुलै रोजी ‘एस’ प्रभागमधील आरोग्य विभागाच्या एका टीमने पवईच्या चार गृहनिर्माण संस्थांचा त्यांच्या इमारतीत कोविड-१९ व्यवस्थापन करण्यासाठी दिलेल्या चांगल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कौतुकपत्र देत सन्मान केला.

पवईच्या हिरानंदानी भागात असणाऱ्या ग्लेन हाइट्स, टिवोली, अटलांटिस आणि ब्लूमिंग हाइट्स (जीएल कंपाऊंड) या चार गृहनिर्माण संस्थाचा यात समावेश आहे.

ब्लूमिंग हाइट्स (जीएल कंपाऊंड) इमारतीत पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र सुपूर्द करताना पालिका अधिकारी

यावेळी पालिका ‘एस’ विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास मोहकर, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी सुजाती ठाकरे, किरण वायभसे आणि पालिका आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना बाधितांच्या यादीत मुंबईमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात १०व्या क्रमांकावर असणाऱ्या पालिका एस विभागाने जून महिन्यात ४थ्या स्थानावर झेप घेतली होती. पालिका एस विभागात पवईचा सुद्धा समावेश आहे. चाळसदृश्य लोकवसाहतीं प्रमाणेच इमारत भागात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या मोठी झाल्याने पालिकेसमोर याला रोखण्याचे एक मोठे आवाहन उभे ठाकले होते. पालिका एस विभागात मिळालेला पहिला रुग्ण सुद्धा पवईतील हिरानंदानीतील एका उच्चभ्रू इमारतीत मिळाला होता. पुढील २ महिने येथील सोसायट्यानी ठोस पाऊले उचलत याचा प्रसार तर रोखलाच होता शिवाय एकही रुग्ण येथे मिळून येत नव्हता. मात्र जून महिन्यापासून पुन्हा इमारत भागात रुग्ण मिळू लागल्याने दबाव वाढला होता.

ग्लेन हाइट्स इमारतीत पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र सुपूर्द करताना पालिका अधिकारी

“कोरोना प्रसाराला रोखण्यासाठी अंमलात आणलेल्या उपाययोजना राबवण्यासाठी आम्हाला नागरिकांचे सहकार्य आवश्यक होते. आम्ही जिथे जिथे रुग्ण मिळत होते तिथे तिथे जावून रहिवाशांना मार्गदर्शन करत होतो. या सूचनांचे पालन करत नागरिकांचे खूप मोठे सहकार्य मिळाल्यामुळेच आज अनेक परिसरात कोरोना प्रसार रोखण्यात आम्हाला यश प्राप्त होत आहे.” असे याबाबत बोलताना पालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.

हे कौतुकपत्र तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी आहे. कोविड-१९ (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) पसरलेला असताना या कठीण काळात आपल्या परिसरात, आपल्या इमारतीत कोरोना बाधितांची संख्या रोखण्यासोबतच याचा प्रसार रोखण्यासाठी आपल्या सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. असा उल्लेख पालिका ‘एस’ प्रभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास मोहकर यांच्या सहीने दिलेल्या या पत्रात आहे.

टिवोली इमारतीत पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र सुपूर्द करताना पालिका अधिकारी

पत्रात पुढे असे लिहिले आहे: कोविडविरूद्धच्या लढाईत कृतज्ञता व्यक्त करतानाच आम्ही तुम्हाला या माध्यमातून प्रोत्साहित करतो. तुमच्या इमारतीतील कोविड-१९ व्यवस्थापनाकडे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन. आपल्या सोसायटी सदस्यांनी आमच्या सर्व कर्मचार्‍यांना केलेले सहकार्य, आम्ही तुमच्या या कृत्यांसाठी खूप आभारी आहोत. पुढील काळातही आपले सहकार्य मिळत राहील ही अपेक्षा करतो.

वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास मोहकर यांनी यावेळी रहिवाशांशी संवाद साधताना इथून पुढील काळात आपल्या सोसायटीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच पवईकरांना पुढील काळात असेच सहकार्य देत राहण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!