ऑनलाईन हॉलिडे व्हिला बुकिंगच्या नावावर फसवणूक

ऑनलाइन हॉलिडे व्हिला बुकिंगच्या नावावर फसवणूक

येणाऱ्या सुट्टीत तुम्ही ऑनलाईन व्हिला किंवा घर बुक करून हॉलिडेसाठी जाण्याची योजना करीत असाल तर सावधान ! आपण व्हिलाचे मालक असल्याचे भासवत सायबर फसवणूक करणार्‍यांना फसवण्यासाठी नवीन मार्ग सापडला आहे. ट्रॅव्हल वेबसाइटवर दुसऱ्याच्या व्हीलाचे फोटो वापरुन बनावट खाती तयार करून लोकांकडून ऑनलाइन हॉलिडे व्हिला बुकिंगच्या नावावर अ‍ॅडव्हान्स पैसे उकळून ग्राहकांची आणि मालकांची फसवणूक करणारी टोळी सध्या कार्यरत आहे.

पवईतील व्यावसायिक आशिष लोणंदकर या फसवणुकीला नुकतेच बळी पडले आहेत. लोणावळ्याजवळील पावना तलावाजवळ आपल्या कुटुंबाच्या मालकीचा एक भव्य व्हिला ते सांभाळतात. या व्हिलाला ते भाड्याने पर्यटकांना राहण्यासाठी देत असतात. अलीकडेच त्यांना बर्‍याच लोकांचे कॉल आले की त्यांनी एका विशिष्ट वेबसाइटवरून त्यांचा व्हिला बुक केला आहे आणि आगाऊ पैसे सुद्धा भरले आहेत. मात्र, त्यांनी अशाप्रकारे कोणतीच बुकिंग केलेली नव्हती. यासंदर्भात त्यांनी पवई पोलिस ठाण्यात फसवणूक आणि बनावट ओळख निर्माण करण्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणंदकर यांच्या काकांचा पावना तलावाजवळ ५ बीएचके व्हिला आहे. लोणंदकर हे तो व्हिला सांभाळतात व सुट्टीसाठी येणाऱ्या लोकांना भाड्याने देतात. या सगळ्या भाड्याचे ते वैयक्तिकरित्या बुकिंग करतात. काही दिवसापूर्वी लोणंदकर यांना एका व्यक्तीचा फोन आला. ज्याने सांगितले की, त्याने एका ट्रॅव्हल वेबसाइटवर त्यांच्या व्हिलाची जाहिरातीवर पाहून बुकिंग केले आहे. त्यांनी नमूद संकेतस्थळावरील जाहिरात तपासली असता त्यांना आढळून आले की, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या व्हिलाचे फोटो वापरून एक जाहिरात वेबसाइटवर टाकली आहे. व्यक्तीने कोणत्याही अधिकृततेशिवाय तेथे मुक्कामाची व्यवस्था करण्याचे आश्वासन देऊन संभाव्य पर्यटकांकडून पैसे घेतले आहेत.

हे वाचलेत का? चांदिवली – हिरानंदानीला जोडणाऱ्या नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात

मला या घोटाळ्याबद्दल समजताच धक्का बसला. आमच्या परवानगीशिवाय दुसरा कोणीतरी खाते तयार करून आमच्या व्हिलाचे फोटो वापरत आहे. आमच्या भाड्याच्या किंमतीपेक्षा स्वस्त दराने तो भाड्याने देत आहे. मला ऑनलाइन पेमेंट करुन व्हिला बुक केल्याचा दावा करणाऱ्या लोकांचे फोन येवू लागले. ऑनलाईन बुकिंग केल्याचा दावा करून पर्यटक पावने येथील व्हिलावर सुद्धा पोहचले होते. मी यापैकी कोणत्याही प्रकरणात बुकिंग केले नव्हते.” असे पोलिसांना दिलेल्या जवाबात तक्रारदार यांनी म्हटले आहे.

लोणंदकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिस भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली फसवणूक, बनावट ओळख निर्माण करणे आणि तोतयागिरी केल्याबद्दल गुन्हा नोंदवित या प्रकरणाचा तपास करत आहेत.

“या नवीन युक्तीचा वापर फसविण्यासाठी होत आहे. सुट्टीसाठी जाणारे हॉटेल किंवा व्हिला ऑनलाईन बुक करून सर्वसाधारणपणे ऑनलाइन आगाऊ बुकिंग रक्कम देणे पसंत करतात. फसवणूक करणारे याचा फायदा घेत आहेत,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!