३ वर्षापासून अटक टाळण्यासाठी परदेशी पळणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवई येथील इंटेग्रीटी लॉजिस्टिक सोल्युशन कंपनीत काम करत असताना २.९ कोटी रुपये लांबवून, अटक टाळण्यासाठी परदेशी पळून गेलेल्या एका वाणिज्य पदवीधराला पवई पोलिसांनी गुरुवारी पुणे येथून अटक केली आहे. विजय गोंदर (३५) असे अटक करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव आहे. फसवणूक करून २०१६ पासून तो फरार झाला होता. गुरुवारी पुणे विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

‘जून २०१५ ते जून २०१६ या काळात पत्नी, मित्र आणि नातेवाईकांच्या विविध १५ खात्यात आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्याने खोट्या खर्चाच्या नावावर कंपनी खात्यातील पैसे हस्तांतरित केले होते. कंपनीच्या पुणे शाखेच्या मुख्य मॅनेजर पदावरील नोकरी सोडल्यानंतर त्याने केलेल्या फसवणुकीची माहिती उघड झाली’ असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पैसे काढण्यासाठी त्याने बनावट खर्चाची माहिती देवून, कंपनीच्या संचालकांच्या स्वाक्षरी केलेल्या चेकचा दुरुपयोग केला होता, असे दाखल तक्रारीत म्हटले आहे.

सत्र न्यायालयात, मुंबई उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात गोंदरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र सर्वच ठिकाणी तो नाकारण्यात आल्यानंतर त्याने लपून राहण्याचा निर्णय घेत परदेशी पलायन केले होते.

फसवणूक आणि विश्वासघात करण्याचा गुन्हा कंपनीचे अकौंटंट रवी कुमार शर्मा यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला होता.

एफआयआरनुसार कंपनीने पुणे येथे २०१३ मध्ये आपली शाखा उघडली होती, ज्यात गोंदरला मुख्य शाखा व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तिथे मिळणाऱ्या सोई-सुविधा आणि खर्चाच्या देयकासाठी कंपनीच्या संचालकांचे सहीचे कोरे चेक त्याला सुपूर्द करण्यात आले होते.

‘कंपनीचे खाते तपासत असताना गोंदर याने खोटी बिले, रसीद सादर करून मोठी रक्कम काढल्याचे समोर आले होते. गोवा येथील एका कसिनो मधील एटीएममधून जुगार खेळण्यासाठी पैसे काढल्याचेही समोर आले होते. पत्नी आणि इतर लोकांच्या खात्यात सुद्धा त्याने कंपनी खात्यातून पैसे हस्तांतरित केल्याचे समजताच कंपनीकडून विचारणा केली असता, त्याने नोकरी सोडून दिली’ असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.

गोंदरच्या पुणे येथील पत्त्यावर पोलीस पथक ४ ते ५ वेळा जाऊन आले होते, मात्र तो मिळून आला नव्हता. मैत्री जुळवणाऱ्या साईटवर गोंदरच्या जानेवारीपासून वाढलेल्या हालचालीने तक्रारदार कंपनीच्या एका व्यवस्थापकाचे लक्ष वेधले होते. दुबई येथे एका कंपनीत मोठ्या पदावर रुजू झाल्याचे, परदेशी भ्रमंतीचे अनेक फोटो त्याने तिथे टाकले होते. या माहितीच्या आधारावर पवई पोलीसांना माहिती पुरवल्यानंतर त्याच्या बद्दल ७ फेब्रुवारीला लुकाउट नोटीस बजावण्यात आली होती. ज्याच्या आधारावर १४ फेब्रुवारीला पुणे एअरपोर्टवर उतरताच त्याला अटक करण्यात आली.

त्याला न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!