गणेशनगर ८ दिवस लॉकडाऊन; कोरोना प्रसार रोखण्यासाठी स्थानिकांचा निर्णय

गणेशनगर ८ दिवस लॉकडाऊनपरिसरात वाढणारा कोरोना प्रसार रोखण्यासाठी सामान्यतः पालिकेतर्फे परिसर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र, पवईतील गणेशनगर (पंचकुटीर) येथील वाढत्या कोरोना बाधितांचा आकडा पाहता येथील स्थानिक नागरिकांनीच आपला परिसर सिल म्हणजेच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार १७ जुलै ते शुक्रवार २४ जुलै या कालावधीत हा लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या कालावधीत मेडिकल आणि दूध विक्री वगळता बाकी सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. शासकीय कर्मचारी वगळता इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यात मनाई करण्यात आली आहे.

“नागरिकांच्या झालेल्या चर्चेत पाठीमागील ३-४ दिवसात अचानक मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळू लागल्याने याला नियंत्रित करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आवश्यक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे स्थानिकांनी ८ दिवसासाठी परिसर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून हा नियम लागू होईल, असे याबाबत बोलताना श्रीगणेशनगर रहिवाशी सेवा संघ यांनी सांगितले.

हा निर्णय घेण्यात आल्यानंतर मंगळवार ते गुरुवार या कालावधीत नागरिकांना आवश्यक असणारे आठवडाभराचे सामान नागरिकांनी भरून ठेवावे अशा सूचना देणारी पत्रके, संदेश गणेशनगर येथील नागरिकांना देण्यात आले आहेत.

प्रसारित करण्यात आलेल्या पत्रकानुसार, ‘सावधान, श्रीगणेशनगरमध्ये कोरोना वाढतोय. एका आठवड्यात १३ रुग्ण सापडले आहेत. परिस्थिती गंभीर असल्यामुळे श्रीगणेशनगरमध्ये शुक्रवार १७-०७-२०२० ते शुक्रवार २४-०७-२०२० पर्यंत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे.

आठ दिवसात विभागातील ऑफिस, दुकाने सर्व बंद राहतील. मंगळवार १४-०७-२० ते गुरुवार १६-०७-२० पर्यंत विभागातील भाजी किराणा दुकाने २४ तास उघडी असतील. पुढील एक आठवडा पुरेल इतका अन्नधान्यसाठा करून ठेवा.’

हे सुद्धा वाचा: पाणीपुरवठा करणार्‍या तलावात ऑक्टोबर पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

“कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना परिसरात करण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतरही परिसरात रुग्ण वाढत असल्याने याचा प्रसार रोखता यावा म्हणून आम्ही सर्व नागरिकांनी मिळून हा निर्णय घेतला आहे,” असे याबाबत बोलताना श्रीगणेशनगर रहिवाशी सेवा संघ यांनी सांगितले.

घेण्यात आलेले सर्व निर्णय हे नागरिकांच्या सुरक्षेसाठीच आणि नागरिकांच्या विचारातूनच घेण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच नागरिक काटेकोरपणे हा लॉकडाऊन पाळणार असल्याचे येथील काही स्थानिकांनी बोलताना सांगितले.

नागरिकांच्या आरोग्यविषयक खबरदारीसाठी बुधवारी पालिकेतर्फे गणेशमंदिर येथे आरोग्य शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. ज्या चाळीमध्ये बाधित मिळाले आहेत. त्या चाळीतील जास्तीतजास्त नागरिकांनी यावेळी आपली तपासणी करून घेतली. मात्र कोणीही संशयित मिळून आले नाही. सर्वांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे समोर आले.

मिळून आलेले कोरोना बाधित हे एकतर विविध कारणांनी रुग्णालयात उपचार घेणारे किंवा बाहेरून आलेले आहेत. तसेच आधी ज्या चाळींमध्ये बाधित मिळाले होते त्याच चाळींमध्ये पुन्हा बाधित मिळून आले आहेत, असेही यावेळी बोलताना काही स्थानिकांनी सांगितले.

पत्रकात नागरिकांना काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. जसेकी, महिलांनी बाहेर भांडी व कपडे धुवू नयेत. मास्क वापरणे बंधनकारक आहे. कोरोना रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांना मदत व योग्य वागणूक द्या. अनावश्यक घराबाहेर पडू नका. मेडिकल चालू राहतील, दूध विक्री सकाळी आणि संध्याकाळी ३ तास चालू राहील. आरोग्याच्या कारणास्तव घराबाहेर पडा. क्वारंटाईन चाळीतील नागरिकांनी बाहेर पडू नये. पोलीस, शासकीय सेवा, बीएमसी, रुग्णालयमधील कामगारांना कामावर जाण्यास मुभा आहे. ५५ वर्षावरील नागरिकांना बाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. घरात कोणालाही ताप व इतर आजार असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. क्वारंटाईन सोसायटीमधील नागरिकांना मदत पाहिजे असल्यास त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!