‘हॅप्पी डॉक्टर्स डे’ – डॉ. बाळकृष्ण अडसूळ, सेव्हनहिल्स इस्पितळाचे अधिष्ठाता यांची कोविड सोबतची लढाई

@प्रमोद सावंत : या वर्षीचा ‘ डॉक्टर्स डे ’ सर्वार्थाने संस्मरणीय आहे. जगभर कोविड-१९चं संकट गहिरं होत असताना डॉक्टर्स हे थेट कोरोनाशी सेनापती सारखे लढत आहेत. इतर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार हे या डॉक्टरांना तेवढीच तोलामोलाची साथ देत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण म्हटल्यावर लोक त्या रुग्णाला, त्याच्या कुटुंबियांना जवळपास वाळीतच टाकत आहेत. माणुसकी आपण विसरत चाललो की काय अशी काही ठिकाणी परिस्थिती आहे. अशा काळात हे कोविड योद्धे त्या रुग्णाची काळजी घेत आहेत. काहीवेळ तोंडाला मास्क लावला तर गुदमरल्यासारखे होते, श्वास कोंडल्यासारखे वाटते मात्र हे सारेजण विशेषत: डॉक्टर्स, नर्स नखशिखान्त पीपीई किट्सचे आवरण घालून १२-१२ तास काम करत आहेत. हे सारं विलक्षण आहे.

या वर्षीचा ‘डॉक्टर्स डे’ सर्वार्थाने संस्मरणीय आहे. जगभर कोविड-१९चं संकट गहिरं होत असताना डॉक्टर्स हे थेट कोरोनाशी सेनापती सारखे लढत आहेत.

डॉ बाळकृष्ण अडसूळ, डॉ कुंभार आणि सहकारी डॉक्टर

अशा या कोविड योद्ध्यांपैकी एक योद्धा म्हणजे डॉ. बाळकृष्ण अडसूळ, सेव्हनहिल्स इस्पितळाचे अधिष्ठाता.

१९८३ साली केईएम रुग्णालयातून ते डॉक्टर झाले. १९९१मध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त करत ते एमडी झाले. १९८८ मध्ये ते सायनच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयात रुजू होत २०१८ पर्यंत म्हणजेच ३० वर्ष त्यांनी सायन रुग्णालयात सेवा दिली. त्यानंतर ते पार्ल्यातील कूपर रुग्णालयात कार्यरत होते.

सेव्हनहिल्स रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून नियुक्त

फेब्रुवारी – मार्चपासून कोविडचा प्रादुर्भाव भारतात विशेषत: मुंबईत जोमाने वाढला. कोरोना बाधितांना वैद्यकीय सुविधा देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांचं वैद्यकीय व्यवस्थापन आणि आपात्कालीन परिस्थिती हाताळण्याचं कसब सर्वश्रृत असल्याने या संकटकाळात त्यांना कूपरवरुन तात्काळ सेव्हनहिल्स रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून नियुक्त केले गेले. त्यांच्या नियुक्तीच्या काहीच दिवसांत देशातील सर्वांत मोठे कोविड सुविधा केंद्र म्हणून सेव्हनहिल्सचा कायापालट झाला.

६ मार्चला नियुक्ती झाल्यापासून डॉ. बाळकृष्ण अडसुळांनी एकही सुट्टी घेतली नाही. दिवस-रात्र ते आपल्या टीमसह कोरोनाबाधितांसाठी झटत आहेत. १२०० बेड्सची क्षमता असलेल्या या रुग्णालयात १००० बेड्स हे विलगीकरणासाठी उपलब्ध आहेत, तर २०० बेड्स हे अतिदक्षता विभागासाठी. अंदाजे ४५०० कोरोनाबाधित इथे दाखल झाले होते, त्यापैकी ३५५० कोरोना संसर्गातून बरे होऊन घरी देखील परतले आहेत. हे शक्य झाले ते डॉ. अडसूळ आणि त्यांच्या सेव्हनहिल्समधल्या अहोरात्र झटणाऱ्या टीम मुळेच. ३२७ डॉक्टर्स, ५१७ नर्सेस, ५५० रुग्णसेवक, २२० सफाई कामगार एवढ्या मोठ्या टीमला सोबत घेऊन डॉ. अडसूळ कोरोनाशी दोन हात करत आहेत.

कोरोनाशी प्रत्यक्ष सामना

कोरोना रुग्णांना ठीक करण्यात सर्वस्व अर्पण केलेल्या त्यांना ३ जूनला जरा संशय आला म्हणून त्यांनी तपासणी केली. संशय खरा ठरला. कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली. फक्त तेच नव्हे तर त्यांची पत्नी डॉ. पुष्पा, दोन मुले चेतन आणि केतन, चेतनची पत्नी श्वेता असे कुटुंबातील सगळेच पॉझिटीव्ह निघाले.

कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या या दाम्पत्यांना आता स्वतः त्याचा सामना करायचा होता. सगळ्यांना सेव्हनहिल्समध्ये दाखल केले गेले. १४ दिवसांनी ते कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. पुष्पा अडसूळ अतिदक्षता विभागात उपचार घेत होत्या, दोनच दिवसांपूर्वी त्यांना सर्वसाधारण विभागात हलवण्यात आले आहे. त्या दादर येथील महानगरपालिकेच्या जी-नॉर्थ विभागामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. अडसूळ २७ जूनला पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.

डॉ अडसूळ यांच्या टीममधील सेव्हनहिल रुग्णालयातील डॉ. महारुद्र कुंभार हे देखील कोरोना पॉझिटीव्ह निघाले होते. औरंगाबाद येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पुढे दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये ५ वर्षांचा अनुभव घेतला. वैद्यकीय क्षेत्राचा १२ वर्षांच्या अनुभवासह सध्या ते महानगरपालिकेच्या सेवेत आहेत.

सेव्हनहिल्समध्ये संपूर्ण मुंबईतील कोरोनाबाधित २४० डॉक्टर्स आणि १६२ नर्सेस दाखल होते. यामध्ये सेव्हनहिल्सचे ५ डॉक्टर्स आणि २० नर्सेसचा समावेश होता.

डॉ. बाळकृष्ण अडसूळ, डॉ. पुष्पा अडसूळ यासारख्या डॉक्टर दाम्पत्यांच्यामुळे आणि डॉ कुंभार यांच्यासह कोरोना काळात रुग्णांच्या सेवेत अविरत काम करणाऱ्या देशातील लाखो डॉक्टर्समुळेच ‘ डॉक्टर्स डे ’ला एक वेगळं वलय आहे. आज ही डॉक्टर म्हटलं कि देवानंतर हात आपोआप कृतज्ञ भावनेने जोडले जातात.

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!