विना हेल्मेट जाताना तरुणांना अडवणाऱ्या पोलिसाला तरुणाच्या वडिलांकडून मारहाण; तिघांना अटक

हेल्मेटशिवाय फिरत असणाऱ्या १९ वर्षीय तरुण बाईकर, त्याच्या मित्राला रोखणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची घटना पवईत घडली. एलएन्डटी येथे पोलिसांनी विनाहेल्मेट आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या लोकांच्यावर कारवाईसाठी लावलेल्या नाकाबंदीत हा प्रकार घडला. तिघा आरोपीना सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्यात अटक करून पवई पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी तिथे ही धिंगाणा घातला.

नशेत गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांना वचक बसावी म्हणून मुंबईत वाहतूक पोलिसांच्यावतीने अदलून-बदलून वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली जाते. २० नोव्हेंबरला साकीनाका वाहतूक विभागाच्या वतीने रात्री ९.३० वाजता पवईतील एलएन्डटी गेटजवळ नाकाबंदी लावण्यात आली होती.

महाविद्यालयीन विद्यार्थी असणारा निखिल सोनवणे (१९), त्याचा मित्र विशाल (३५) याच्यासोबत विनाहेल्मेट तिथून जात असताना वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवले. पोलीस हवालदार सुनील त्यांची विचारणा करत असताना विशाल हा नशेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

‘विना परवाना आणि विना हेल्मेट वाहन चालवत असल्यामुळे त्यांना दंड भरायला सांगितला असता त्यांनी शिवीगाळ करत निखिलने आपल्या वडिलांना (शरद – ४९) फोन करून बोलावून घेतले. शरद यांनी सुद्धा आर्वाच्य भाषेत बोलत “तुम्ही पैसे लाटण्यासाठी सर्व करता” असे म्हणत धक्काबुक्की करायला सुरुवात केली. असे पोलीस हवालदार सुनील यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

नाकाबंदीत वाद घालणाऱ्या या तिघांना तिथे उपस्थित इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तिघांना समजूत घालून पवई पोलिस ठाण्याला आणण्यास जवळपास १ तास लागला. पवई पोलीस ठाण्यातही त्या तिघांनी धिंगाणा घातल्यानंतर पवई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा नोंद करून तिघांना अटक केली.

तिघांनाही स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

साकीनाका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर झालेला हा पहिला हल्ला नसून, सप्टेंबर महिन्यात ट्रिपल सीट जाताना अडवले म्हणून एका पोलीस शिपायाच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आली होती. साकीनाका येथे अडवणाऱ्या एका पोलीस शिपायाला मारहाण करण्यात आली होती. सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मज्जाव करणाऱ्या पवई पोलीस ठाण्याच्या पोलिस शिपायाला एप्रिल महिन्यात तरुणांकडून मारहाण करण्यात आली होती. अशा अनेक घटना पोलिसांसोबत घडलेल्या आहेत. पोलीस आपल्या सुरक्षेसाठी नसून, आपल्याला त्रास देण्यासाठी असल्याचा समजचं जसा तरुणांमध्ये रुजला गेला असल्याने तरुणांकडून अशा प्रकारे हल्ले केले जात असल्याचे जाणकारांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!