पवई तलावाजवळील सायकल ट्रॅकला ३१ जानेवारीपर्यंत हायकोर्टाची स्थगिती

मुंबई महापालिकेचा पूर्व उपनगरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या पवई तलावाजवळ बनवण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅक प्रकल्पाच्या कामाला दिलेली स्थगिती हायकोर्टाने ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता बारगळल्याची चर्चा आहे.

या प्रकल्पाविरोधात आयआयटी पवईतील दोन विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ज्यावर मंगळवारी सुनावणी झाली. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी आणखीन वेळ हवा असल्याचे कोर्टाला सांगण्यात आल्याने हायकोर्टाने ही सुनावणी १३ डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

मुंबई महानगरपालिकेमार्फत महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतर्गत पवई तलावालगत सायकल, जॉगिंग ट्रॅक आणि तलावाचं सुशोभिकरण केलं जाणार आहे. पालिकेतर्फे तलावाजवळ सायकल ट्रॅकच्या कामाला सुरुवातही झाली आहे. मात्र हा सायकल ट्रॅक खारफुटीच्या जागेवर बांधण्यात येत असून, त्यासाठी तलावात भराव टाकला जात आहे. तसेच यासाठी इथली काही झाडेही तोडली जात आहेत, त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होईल, असा दावा करत पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक संस्थांनी याला विरोध दर्शवला आहे.

या प्रकल्पाविरोधात आयआयटी मुंबईमध्ये पीएचडी करणाऱ्या ओमकार सुपेकर व अभिषेक त्रिपाठी या दोन विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पवई तलावानजीक अनेक मोठी झाडं आहेत, तिथं विविध प्रजातीचे प्राणी आणि पक्षीही आहेत. तसेच तलावात मगर, कासव व विविध जलचरांचही अस्तित्व आहे. सायकल ट्रॅकमुळे या नैसर्गिक संपत्तीला हानी पोहचून जनावरांच्या नैसर्गिक अधिवासावर गदा येऊ शकते असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

नैसर्गिक हानी करून इथं कोणतंही बांधकाम केलं जात नाही असा दावा पालिकेने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून या कामाला १८ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली होती, जी आता थेट ३१ जानेवारीपर्यंत वाढवली आहे.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!