पवई परिसरात धुडगूस घालणाऱ्या इराणी टोळीच्या सदस्यांच्या हिरानंदानी कमांडोनी आवळल्या मुसक्या

सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, वाहनातील वस्तूंची चोरी, वाहन चोरी, पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची लुटालूट करणाऱ्या प्रख्यात इराणी टोळीच्या २ सदस्यांच्या हिरानंदानी कमांडोनी शनिवार, ०३ जानेवारीला मुसक्या आवळल्या आहेत. पकडलेल्या २ तरुणांना पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस त्यांच्याकडे अधिक तपास करत आहेत. मिसम गुलाम अब्बास शेख (२०) आणि अली अजीज सय्यद (१८) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

पवई, चांदिवली आणि आसपासच्या परिसरात सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, वाहन चोरी, वाहनाच्या काचा फोडून त्यातील मौल्यवान वस्तूंची चोरी, पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची लुटालूट करणाऱ्या घटना सतत घडत असल्याने यांना रोखण्याचे आव्हान उभे ठाकले होते. यातच या टोळीतील सदस्यांनी हिरानंदानी सारख्या उच्चभ्रू वस्तीत पहाटे आणि संध्याकाळी वॉकसाठी किंवा कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना आपले टार्गेट बनवल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

“कॉम्प्लेक्समध्ये आठवड्यातून २ – ३ घटना घडत होत्या, नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर तैनात आमच्या एसटीएफवर मोठा तणाव होता. परिसरात घडलेल्या काही गुन्ह्यात आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळून आल्याने या चोरीच्या मागे असणारे काही चेहरे आणि वाहने समोर आली होती. त्या सर्वांवर आमचे पथक लक्ष ठेवून होते,” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना हिरानंदानी कमांडोजनी सांगितले.

 

ते पुढे म्हणाले, “आम्हाला मिळालेल्या एका नंबरची मोटारसायकल शनिवारी हिरानंदानी परिसरात फिरताना आमच्या पथकाला आढळून आली. आम्ही संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये सापळा रचत मोटारसायकलवरून आलेल्या एकाला डी-मार्टजवळ तर दुसऱ्याला एव्हलॉन इमारतीजवळ गाठत ताब्यात घेतले. यावेळी एव्हलॉनजवळ पकडण्यात आलेल्या तरुणाने आमच्यावर चाकूने हल्ला सुद्धा केला, मात्र त्यातून बचाव करत आमच्या पथकाने त्यांना पकडले.”

मोटारसायकल आणि मोबाईल हस्तगत

दोन्ही तरुणांना पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिसांनी त्यांच्याकडून २ मोटारसायकल आणि मोबाईल हस्तगत केले आहेत.

“ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी मिसम गुलाम अब्बास शेख (२०), हा घाटकोपर येथे राहतो तर दुसरा तरुण अली अजीज सय्यद (१८) हा कल्याण येथील आंबिवली भागातील आहे. मिसम याचा वडील अब्बास शेख याला सुद्धा गुजरातमध्ये चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनीही पवई परिसरातील केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली असून, मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरु आहे, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

या दोघांचा मुंबईमधील इतर भागात सुद्धा अशा प्रकारच्या घटनांमध्ये समावेश आहे का? याबाबत सुद्धा पवई पोलीस शोध घेत आहेत.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!