प्रामाणिक पवईकराने परत केले रस्त्यावर सापडलेले पैशाने भरलेले पाकीट

आजच्या जमान्यातही समाजात प्रामाणिकपणा, माणुसकी टिकून आहे याची प्रचिती देणारे उदाहरण नुकतेच पवईतील तरुणाच्या कृत्यातून पहायला मिळाले. पैशांनी भरलेले पाकीट रस्त्यावर पडलेले मिळाल्यानंतर तरुणाने मिळालेल्या पैशांचा मोह न ठेवता त्या पाकिटाच्या मूळ मालकाचा शोध घेत त्यास पाकीट परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. प्रमोद वाघ असे या तरुणाचे नाव असून, पवईतील तुंगागाव भागात ते राहतात.

वाघ हे शनिवारी संध्याकाळच्या सुमारास गाडीवरून आपल्या घरी परतत असताना एस एम शेट्टी शाळेजवळ रस्त्यावर भारतीय चलनातील नोटा आणि एक पाकीट पडले असल्याचे त्यांना दिसले. रस्त्यावर पडलेले पैसे जमा करत त्यांनी ते पाकीट उचलून घेतले. “पाकिट नोटांसह कागदपत्रांनी भरलेले होते. पाकिटात मिळालेल्या ओळख पत्रावरून मिलिंद गुर्जर नामक डॉक्टरांचे ते असल्याचे लक्षात आले. त्यात मिळालेल्या नंबरवर मी त्यांच्याशी ५ ते ६ वेळा संपर्क साधला मात्र त्यांनी फोन उचलला नाही.” असे याबाबत बोलताना वाघ यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “मी त्वरित त्यांच्या विजिटिंग कार्डावर असणाऱ्या त्यांच्या क्लिनिकवर पोहचलो, मात्र ते तिथे नव्हते. मी पुन्हा त्यांना फोन लावला तेव्हा त्यांनी तो फोन उचलला आणि त्यांचे पाकीट मला मिळाले असल्याची त्यांना माहिती दिली. काही वेळातच ते लेकहोम येथील क्लीनिकजवळ आल्यावर मी ते पाकीट त्यांना परत केले. पाकीट परत मिळालेले पाहून त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि समाधान होते ते मला सुखावून गेले.”

वाघ यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक डॉ गुर्जर यांनी तिथे केलेच पण, ‘तुम्हीं काल माझे पाकीट जसेच्या तसे मला परत दिलेत, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमचा प्रामाणिकपणा प्रशंसनीय आहे. आजच्या काळात हे दुर्मिळ होत चालले आहे. तुम्ही जी माणुसकी दाखवलीत ती सुद्धा स्तुती योग्य आहे.’ असा संदेश वाघ यांना पाठवत गुर्जर यांनी त्यांना एक सन्मानपत्रच दिले.

या घटनेतूनच समाजात आणि लोकांमध्ये आजही प्रामाणिकपणा, आत्मियता टिकून आहे याची प्रचिती येते.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!