घरफोडीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगाराला अटक

पवईतील तुंगागाव, केबीएम कंपाऊंड साकीविहार रोड भागात घरात घुसून घरातील मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नुकतीच अटक केली आहे. दिपक उर्फ लीचू जगबीर सारसर (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पवई पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या ३ गुन्ह्यांची उकल त्याच्या अटकेतून झाली आहे.

पवईतील तुंगागाव, केबीएम कंपाऊंड साकीविहार रोड भागात लोकांच्या घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्याने धुमाकूळ घातला होता. पवई पोलीस ठाण्यात याबाबत सतत तक्रारी येत असल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाला या गुन्ह्याचा छडा लावण्याची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती.

‘चोरट्याचा शोध सुरु असताना आमच्या खास खबऱ्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार दिपक याच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहीती आमच्या पथकाला दिली. दिपकचा शोध घेऊन पाळत ठेवून पुढच्या गुन्ह्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत त्याने या भागात केलेल्या ३ गुन्ह्यांची कबुली दिली आहे’ असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.

गुन्ह्याची पद्धत

दिपक परिसरात असणाऱ्या घरांवर नजर ठेवून असे, पहाटेच्या वेळी घरातील व्यक्ती निद्रिस्त अवस्थेत असताना खिडकी किंवा दरवाजाने घरात प्रवेश करून हाताला लागेल ती किंमती वस्तू चोरी करून त्वरित पसार होत असे.

पोलिसांनी अटक आरोपीकडून तिन्ही गुन्ह्यात चोरीला गेलेली मालमत्ता हस्तगत केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी विनोद लाड, पोलीस हवालदार राजाराम कुंभार, पोलीस नाईक संतोष देसाई, पोलीस नाईक दामू मोहोळ, पोलीस शिपाई भरत देशमुख, पोलीस शिपाई सचिन गलांडे, पोलीस शिपाई अशोक परब पथक गुन्ह्याची चौकशी करत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!